कोरोनाला रोखण्यासाठी मुंबईत जमावबंदी

मुंबई – सुरुवातीपासूनच देशातील कोरोना विषाणू संसर्गाचा हॉटस्पॉट बनलेल्या मुंबई शहरात मिशन बिगिन अगेन – १ प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणात कोरोनाग्रस्त वाढले आहेत. अशातच कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक महत्वाचं पाऊल उचललं आहे. मुंबई पोलीस आयुक्तालायाने जाहीर केलेल्या पत्रकानुसार आज मध्यरात्रीपासून मुंबईमध्ये जमावबंदी लागू करण्यात येत असून ती येत्या १५ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत कायम असणार आहे.

नव्या नियमांनुसार आता केवळ अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांनाच पहाटे ५ ते रात्री ९ या वेळेत बाहेर पडण्याची परवानगी देण्यात येणार आहे. तर सर्वसामान्य नागरिकांना कामासाठी केवळ दोन किलोमीटर अंतरापर्यंतचा प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल. यासंदर्भातील आदेश पोलीस उपायुक्त प्रणय अशोक (ऑपरेशन्स) यांनी दिले आहेत.

पोलीस उपायुक्तांच्या या आदेशानुसार सार्वजनिक, धार्मिक वा इतर कोणत्याही ठिकाणी एक किंवा त्याहून अधिक व्यक्तींच्या उपस्थिती व प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे. असं असलं तरी अत्यावश्यक सुविधा पुरवणाऱ्या व्यक्तींना याबाबतची परवानगी असेल.

तत्पूर्वी, मिशन बिगिन अगेनच्या पहिल्या टप्प्यामध्ये सरकारतर्फे नागरिकांना मोठ्या प्रमाणात सवलती देण्यात आल्या होत्या. मात्र यानंतर मुंबईत अनेक ठिकाणी गर्दी होत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. तसेच कोरोनाग्रस्तांच्या संख्येत देखील मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागल्याने मुंबईमध्ये जमावबंदी लागू करण्याचे पाऊल उचलावे लागले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.