हिंगोलीत 19 ऑगस्टपर्यंत संचारबंदी

हिंगोली (प्रतिनिधी) – हिंगोली जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने 19 ऑगस्टपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी दिले आहेत. संचारबंदीच्या कालावधीत जिल्ह्यातील सर्व बॅंका केवळ शासकीय कामकाजासाठी चालू राहणार आहे.

तसेच सदर कालावधीत अत्यावश्‍यक सेवा, सर्व शासकीय आस्थापना सुरु राहणार आहेत. परंतू याकरिता सर्व अधिकारी-कर्मचारी यांच्याकडे संबंधित विभागाकडील आदेश, ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक असणार आहे. तसेच सदर कालावधीत पेट्रोल पंप केवळ शासकीय वाहने, अत्यावश्‍यक सेवा देणारी वाहने व कृषी सेवा संबंधित वाहने यांना इंधन पुरवठा करण्यासाठी चालू राहणार आहेत.

याशिवाय अंतर जिल्हा प्रवासासाठी केवळ वैद्यकीय किंवा अपरिहार्य कारणासाठी ई-पास देण्यात येणार आहे. संचारबंदीच्या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी संचाराची मुभा असलेल्या व्यक्तींना सामाजिक अंतर राखणे व मास्कचा वापर करणे बंधनकारक असणार आहे.

जिल्हाधिकारी करोनाबाधित
हिंगोलीच्या जिल्हाधिकारी यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात उपचार सुरू आहेत. त्यांचे स्वॅब नमुने सोमवारी घेतले होते. मागील तीन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेचे सीईओ यांना करोनाची लागण झाल्याचे स्पस्ट झाल्याने जिल्हा परिषदेचे कामकाज तीन दिवस बंद ठेवले आहे. त्यापाठोपाठ जिल्हाधिका-यांनाही करोना विषाणूने आपल्या विळख्यात घेतले आहे. यामुळे जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी वर्गात खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.