लोणी धामणी- करोना व्हायरसमूळे लॉकडाऊन सुरू झाला आणि इतर कामांबरोबरच शेतीची कामेही ठप्प झाली होती; पण दोन दिवसांपूर्वी लॉकडाऊन शिथील झाल्यामुळे आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी-धामणी या दुष्काळग्रस्त परिसरात शेतीच्या मशागतीला सुरुवात झाली आहे.
या परिसरातील लोणी, धामणी, शिरदाळे, पहाडदरा, वडगावपीर, मांदळेवाडी ही गावे दुस्काळग्रस्त म्हणून ओळखली जातात; पण चालू वर्षी जूनपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मार्चअखेरपर्यंत पाणी टंचाई भासली नाही. सध्या उष्णता वाढली असून ओढे, नाले कोरडे ठणठणीत पडले आहेत.
विहिरींनी तळ गाठ आहे, त्यामुळे या गावांपैकी दोन गावांनी पाण्याचे टॅंकर सुरू करावेत, असे प्रस्ताव पंचायत समितीकडे दिले आहेत. सध्या शेतातील कामे उरकत आली आहेत. लॉकडाऊनमुळे आर्थिक समस्या निर्माण झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी परंपरिक पद्धतीने बैलांच्या साह्याने शेती नागंरटीला सुरुवात केली आहे. उन्हाचा कडाका वाढल्याने शेतकरी सकाळी व संध्याकाळी अशा दोन सत्रांत शेतीची नागंरट करीत आहेत.