पाच दिवसांनंतर भाजी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी
लोणी काळभोर- लोणी काळभोर (ता. हवेली) येथे पाच दिवसानंतर पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनाने आज (दि. 28) सकाळी 8 ते 11 या कालावधीत किराणा दुकान व भाजी विक्रेते यांना व्यवसाय करण्यास परवानगी दिली होती. प्रशासनाकडून बॅरेकेट्स लावण्यात आले आहेत. मात्र या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग होत नव्हते. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात या कालावधीत सर्वत्र लोकांचा वावर वाढला होता आणि भाजी खरेदीसाठी लोकांनी गर्दी केली होती.
लोणी काळभोर येथील खाजगी रुग्णालयात ऊरुळी कांचन येथील करोनाबाधीत महिलेवर दहा दिवसांपूर्वी उपचार करणारे एक डॉक्टर, एक परिचारिका व एक तंत्रज्ञ अशा तीन जणांना करोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. करोनाबाधीत रुग्ण मिळून आलेले कदमवाकवस्ती व लोणी काळभोर ही दोन्ही गावे मेडिकल, दवाखाने व दूध वितरण वगळता पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत. येथील 5 किलोमीटर अंतर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे; पण आज याबाबतीत नागरिकांमध्ये गांभीर्य दिसून आले नाही.
करोनामुळे संचारबंदी असतानाही नागरिक कोणत्या ना कोणत्या कारणाने घराबाहेर पडत आहेत. यात आज (दि. 28) भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्त लावला असला तरी भाजीपाला जीवनावश्यक वस्तूंमध्ये मोडत असल्याने त्याच्या खरेदीसाठी नागरिक संचारबंदीचा नियम मोडत असल्याचे दिसून आले. ग्रामपंचायत, पोलीस व महसूल प्रशासन आपापल्या परीने चांगले काम करत आहेत; परंतु नागरिक या प्रयत्नांना प्रतिसाद देत नसल्याचे चित्र आहे.
- भाजीबाजारात सूचनांची पायमल्ली
आज सकाळी भाजी बाजारात आलेल्या लोकांनी सुरक्षेसाठी कोणतीही काळजी घेतली नव्हती. यामुळे लॉकडाऊनच्या उद्देशाला मुरड बसत आहे. एकमेकात अंतर न ठेवता ते सर्वत्र वावरत असल्याचे चित्र आहे. व्यापारी आणी खरेदीदार यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर झाली होती. या सगळ्यांना सोशल डिस्टन्स राखा, असे लोणी काळभोरचे ग्रामविकास अधिकारी डी. के. पवार व ग्रामपंचायत कर्मचारी सांगत होते; परंतु नागरिक त्याकडे दुर्लक्ष करीत होते. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तर गेल्या एक दिड महिन्यांपासून साप्ताहिक सुटीही मिळालेली नाही. मात्र, त्यांनी सांगितलेल्या सुचना नागरिकांनी आज सकाळी बिलकूल ऐकल्या नाहीत.