अर्थमंत्रालय आणि सेबीचे परिस्थितीकडे बारीक लक्ष
मुंबई/ न्यूयॉर्क – मागणी नसल्यामुळे जागतिक क्रुड बाजारात क्रुडचे दर ऐतिहासिक नीचांकावर गेले आहेत. अमेरिकेतील फ्यूचर बाजारात मे महिन्यासाठीचे क्रुड फ्युचरचे दर चक्क शुन्य डॉलरच्याच्या खाली गेले. त्यामुळे जागतिक इंधन बाजारात हाहाकार उडाला आहे. प्राप्त माहितीनुसार सोमवारी सायंकाळी अमेरीकेतील क्रुड फ्युचरचे मे महिन्यासाठीचे दर -37 डॉलरपर्यंत कोसळले होते. मात्र मंगळवारी सकाळी यामध्ये काही प्रमाणात सुधारणा झाली. मे महिन्याचे क्रुड फ्युचरचे दर कोसळले तरी जून महिन्यासाठी चे दर 20 डॉलर प्रति पिंप या पातळीवर आहेत.
भारतातील कमोडीटी बाजाराने मात्र जागतीक प्रमाणात क्रुडचे दर कमी न करता 1 रुपया प्रति पिंप या पातळीवर सौदे गृहीत धरले आहेत. त्यामुळे ब्रोकर्सचे जास्त नुकसान होणार नाही. या घडामेडीचा शेअर बाजार नियंत्रक आणि अर्थमंत्रालयाने गंभीर दखल घेतली आहे. या घडामोडीकडे बारीक लक्ष असल्याचे सांगण्यात आले.
अमेरिकेसह जगातील सर्व देशांनी कमी दरावरील क्रुड विकत घेऊन त्याचा साठा करण्याचा सपाटा सुरू ठेवला होता. मात्र आता सर्व देशाची साठा करण्याची क्षमता संपली आहे. तेल उत्पादक देशांनी उत्पादन दररोज 1 कोटी पिंप कमी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तरीही मागणी नसल्यामुळे क्रुडचे दर कोसळले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका आणखी साडेसात कोटी पिंप साठा करणार असल्याचे सांगितले आहे.
क्रुड फ्युचर चे दर जरी 0 डॉलरच्या पातळीपर्यंत गेले असले तरी ग्राहकांना मात्र क्रूडचे दरफ्युचर बाजारात कमी झाल्यामुळे इंधन त्या प्रमाणात स्वस्तात मिळण्याची शक्यता कमी आहे. तेल कंपन्यांनी ज्या दरावर खरेदी केली आहे त्याच दरावर ग्राहकांना इंधनासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. मात्र सध्या ग्राहक इंधनाचा वापरच करीत नाही त्यामुळे क्रुडचे दर 0 डॉलरपर्यंत कोसळण्यासारखी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामध्ये दोन महिने तरी फारसा फरक पडणार नाही. मुळात इंधनाचे दर मागणी इतके कमी झाल्यामुळे जागतिक विकास दरावर याचा मोठा सकारात्मक परिणाम होणार आहे.
वाहतूकदारांची इंधनाचे दर कमी करण्याची मागणी
जागतीक बाजारात क्रुडचे दर कोसळले आहेत. त्यामुळे सरकारने भारतातील इंधनाचे दर ताबडतोब कमी करावी अशी मागणी वाहतूकदारांच्या संघटनानी केली आहे. त्याचबरोबर सोमवारपासून सुरू करण्यात आलेले टोलचे संकलन बंद करण्याची मागणी अ भा मोटार ट्रान्सपोर्ट कॉंग्रसने केली आहे. या वर्षात जागतीक बाजारात इंधनाचे दर 60 टक्क्यानी कमी होऊनही भारतातील इंधनाचे दर मात्र कवळ 10 टक्क्यानी कमी झाले आहेत. कारण भारतात इंधावर केंद्र व राज्याचे कर मोठ्या प्रमाणात आहेत.