बारामती औद्योगिक वसाहतीतील स्थिती; दुष्काळास्थितीचा परिणाम
जळोची- देशाचा कणा म्हणून ओळखली जाणारी शेती दुष्काळामुळे आणि औद्योगिक वसाहतही मंदीच्या सावटातून जात आहे. बारामती तालुक्यासह लगतच्या जिल्ह्यांतील दुष्काळीस्थितीमुळे शेतात काम नसल्याने बारामती औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांच्या गेट समोर कुशल, अकुशल कामगारांची गर्दी दिसू लागली आहे. शेतात काम नसल्याने अनेक जण मिळेल ते काम मिळवण्याकरिता औद्योगिक वसाहतीत येत असल्याचे चित्र आहे.
बारामती तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण खूपच कमी असल्याने शेती अडचणीत आली आहे. कालव्यांना आवर्तने नसल्याने तसेच पाण्याचे स्त्रोत आटल्यानेही शेती पडीक ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. खरीप हंगामात शेतात काहीच काम नव्हेत आता रब्बीची तयारी सुरू करायची असली तरी पावसाअभावी रान मोकळी पडली आहेत. यामुळे शेतमुजरांना काम नाही तसेच शेतकरी कुटूंबातील अनेक तरूण मुले मोळ्या रानात फिरून घरी परतत आहेत. खरीप नंतर रब्बी हंगामावरही दुष्काळाचे सावट असल्याने शेतमुजरांसह शेतकरी कुटूंबातील बहुतांशी तरूण औद्योगिक वसाहतीत कामाकरिता चकरा मारू लागले आहेत.
बारामती तालुक्यातील बहुतांशी गावांना व्यावसायाची परंपरा लाभली आहे. शेतीवर अवलंबून राहणाऱ्या कुटुंबाची संख्या जास्त असली तरी आज प्रत्येक शेतकरी कुटूंबातील एक-दोन मुले नोकरीकडे वळत आहेत. तालुक्यात मोठी औद्योगिक वसाहत असल्याने कंपन्यांमध्ये कुलश, अकुशल कामगारांची गरज असते. यातूनच रोजगार उपलब्ध होत असतात. त्यातच आता दुष्काळीस्थितीमुळे अनेक तरूणांनी कंपन्यांची वाट धरल्याने याचा म्हणून शेतीमुजर मिळणेही कठीण झाले आहे. कंपन्यांमध्ये काम केल्यास 300 ते 500 रुपयांपर्यंत हजेरी सहज मिळत असल्याने व हे काम सातत्याने मिळत असल्याने महिला, तरुण व मध्यमवयीन पुरुषही कंपन्यांत काम मिळवण्याकरिता जात आहेत. यामुळेच शेतमजुर उपलब्ध होण्यावरही परिणाम झाल्याने शेती करणेही अवघड होऊन बसले आहे.
- मातीतील हात झाले काळे…
बारामती तालुक्यात निर्माण झालेली दुष्काळी स्थिती तसेच पीकांनाही चांगला भाव मिळत नसल्याने शेतकरी शेतमजुरांना मोठ्या प्रमाणात हजेरी देऊ शकत नाही. महिला मजुरांना 200 ते 250 रूपये आणि पुरूष मजुरांना 300 ते 350 रूपये शेतमुजरी देऊनही मजूर मिळत नसल्याचे स्थिती असते. यावर्षी तर दुष्काळच पडल्याने शेतात काम नाही. यामुळे शेतकऱ्याच्याच हाताला काम नाही. यामुळेच शेतातील मातीत राबणारे हात कंपन्यांमध्ये काळे होऊ लागले आहेत.