वाघळवाडी- सोमेश्वर कारखान्याने ऊस दर गुणवत्तेवर दिला असून कोणाच्याही दराची वाट न पाहता सोमेश्वरने हा दर सभासदांना दिला आहे. यात अन्य कारखान्यांशी ऊसदरासाठी स्पर्धा करण्याचा कोणताही हेतू नाही. तसेच, माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना 3400 रूपये प्रति मे. टन दिलेला ऊसदर हा गेटकेनच्या मेहरबानीवर दिला गेल्याचे श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितले.
सोमेश्वर कारखान्याने 2018-19 गळीत हंगाम करीता 3300 रूपये दर जाहीर केल्यानंतर माळेगावनेही सभासदांकरिता 3400 रूपये दराची घोषणा केली, असे असताना माळेगावने गाळप हंगाम 2018-19 मध्ये गेटकेन ऊस उत्पादकांना प्रतिटन 2850 रूपये दर दिला असून सभासदांपेक्षा तब्बल 550 रूपये गेटकेनला कमी दिलेला आहे म्हणजेच गेटकेन ऊस उत्पादकांना जवळपास 20 कोटी रूपये कमी मिळालेले आहेत.
याचाच फायदा माळेगावला सभासदांनी अधिकचे 275 रूपये प्रतिटन देण्यात झाला आहे. गाळप हंगाम 2018-19 मध्ये माळेगावने सभासदांच्या 7,14,000 मे.टन उसाचे गाळप केले आणि याच हंगामात सोमेश्वरने 10,04,000 मे.टन सभासदांच्या उसाचे गाळप केले याचाही विचार होणे गरजेचे असल्याचे जगताप यांनी सांगितले.
जगताप म्हणाले की, अनुदानासह सभासद व गेटकेन या दोघांची ऊस दर सरासरी पाहता माळेगाव कारखान्याचा प्रतिटन 3251 रूपये असून सोमेश्वरने गाळप केलेल्या पूर्ण 10,04,000 मे.टन उसास 3300 रूपयेप्रतिटन ऊस दर दिलेला आहे. 2016-17 व 2017-18 या दोन वर्षांत 44 कोटींचा निधी तयार केला.