राष्ट्रवादीवर टीका हा पब्लिसिटी स्टंट : रजनी भोसले

सेस फंडाच्या संदर्भात ऋतुजा शिंदे यांच्यावर आगपाखड

वाई – निधी वाटपाचा मुद्दा उपस्थित करून ऋतुजा शिंदे ह्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यातील वाई पंचायत समितीच्या कार्यपद्धतीवर नाहक चिखलफेक करत आहेत. राष्ट्रवादीच्या माध्यमातून आ. मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीच्या कारभारात कोणत्याही सदस्यावर अन्याय केला जात नाही. यापूर्वी परखंदी गावातील विकासकामांसाठी ऋतुजा शिंदे यांना सेस फंडातून अनेकदा निधी देण्यात आला. आधी दिलेला निधी ऋतुजा शिंदे यांनी खर्च करून दाखवावा, मगच बिनबुडाचे आरोप करावेत. सेस फंडाच्या मामुली मुद्‌द्‌यावरून राष्ट्रवादीवर आरोप करणे, हा ऋतुजा शिंदे यांचा पब्लिसिटी स्टंट आहे. शेंदूरजणे गणातील जनता या भूलथापांना बळी पडणार नाही, अशी खरमरीत टीका पंचायत समितीच्या सभापती सौ. रजनीताई भोसले व उपसभापती अनिल जगताप यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

त्यांनी म्हटले आहे की, सेस फंडातून निधी वाटप करताना कॉंग्रेसच्या सदस्यांना जाणीवपूर्वक डावलले जाते, म्हणून सर्वसाधारण सभेतून सभात्याग करण्याचा स्टंट आणि राजकीय वलय नसलेले पती विराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीवर मोर्चा काढून ऋतुजा शिंदे यांनी स्वतःचे हसे करून घेतले होते. ऋतुजा शिंदे यांनी पतीच्या सांगण्यावरून पंचायत समितीच्या कारभारावर शिंतोडे उडवू नयेत. सेस फंडातून परखंदीतील बौद्ध वस्तीतील समाजमंदिराची दुरुस्ती झाली.

गावातील भैरवनाथ मंदिर परिसर सुधारण्यासाठी लाखोंचा निधी दिला, मात्र, तुम्ही कामात बदल केल्याने ते पूर्ण न होता निधी पडून आहे. आधीचा निधी वापरल्याशिवाय त्या सदस्याला पुन्हा निधी देऊ नये, हा सभागृहाचा निर्णय आहे. नवीन निधी येताच ऋतुजा शिंदे यांना देण्यात येणार आहे.

तुमच्या पक्षाचे सदस्य दीपक ननावरे यांनाही विकास कामांसाठी सेस फंडातून निधी देण्यात आला आहे. मग, कॉंग्रेस सदस्यावर अन्याय कसा झाला? ऋतुजा शिंदे धादांत खोटे बोलत आहेत. शेंदूरजणे गणाच्या विकासासाठी आ. मकरंद पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस समर्थ असून नाहक आरोप करणाऱ्या विराज शिंदे यांनी आपली राजकीय उंची तपासावी, असा उपरोधिक सल्ला अनिल जगताप यांनी दिला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्य पै. विक्रांत डोंगरे, मधुकर भोसले, सुनीता कांबळे, संगीता चव्हाण उपस्थित होत्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.