लंडन –भारतीय खेळाडूंना उद्देशून स्लेजिंग केल्यामुळे सध्या इंग्लंडच्या खेळाडूंवर टीका सुरू आहे. त्यातच भारताचा सलामीवीर फलंदाज लोकेश राहुलने जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा देत स्लेजिंगला भीत नसल्याचे सांगितले. तुम्ही आमच्या एका खेळाडूला स्लेजिंग केले तर आम्ही तुमच्या सगळ्या अकरा खेळाडूंविरुद्ध त्याच भाषेत उत्तर देऊ, असा इशाराही त्याने दिला.
स्लेजिंगचा आम्हाला फरक पडत नाही. जेव्हा दोन बलाढ्य संघ एकमेकांविरुद्ध खेळतात तेव्हा स्लेजिंग घडण्याची शक्यताही असतेच. आम्ही स्लेजिंगकडे लक्ष देत नाही. तुम्ही आमच्या एका खेळाडूला लक्ष्य केले तर, आम्ही तुमच्या 11 पैकी 11 खेळाडूंना लक्ष्य करू, असेही राहुलने सांगितले.
जेम्स अँडरसन व विराट कोहली, जोस बटलर व जसप्रीत बुमराह यांच्यात वाद घडले. बुमराह खेळत असताना इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूटनेही स्लेजिंग केले होते. मात्र, बुमराहसह कोहली, महंमद शमी यांनीही जशास तसे उत्तर दिले होते. इंग्लडमधील प्रेक्षकांनी राहुलवर बॉटलची झाकणे (क्राऊन्स) फेकली होती.
त्या वेळीही कर्णधार कोहलीने राहुलला प्रेक्षकांच्याच दिशेने तीच झाकण परत फेकण्याचा इशारा केला होता. कोहली आक्रमक खेळासाठी ओळखला जातो आणि आता संपूर्ण संघही त्याच पद्धतीने आक्रमक होऊन विरोधी संघावर दबाव आणत आहे.