पिंपरी – रस्ता अडवून आंदोलन केल्याप्रकरणी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांच्यासह 24 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 6) केएसबी चौक येथे घडली.
कॉग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, महिला शहराध्यक्ष सायली नढे, किरण नढे, विजय ओव्हाळ, आबा खराडे, उमेश खंदारे, विश्वनाथ जगताप, ज्ञानेश्वर मलशेट्टी, सौरभ शिंदे, अर्जुन लांडगे, किरण कोचकर, इस्माईल संगम, दिनकर भालेराव, निर्मला खैरे, बाबा बनसोडे, सतीश भोसले, प्रिया कदम, शरद गायकवाड, पांडुरंग जगताप, विशाल सरोदे, आकाश शिंदे, निखिल भोईर, सुरज गायकवाड आणि निर्मला कदम अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दादाराम साहेबराव जाधव यांनी रविवारी (दि. 6) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माथाडी कामगार नेते माजी आमदार कै. अण्णासाहेब पाटील यांचे स्मारक केएसबी चौक, चिंचवड येथे उभारण्यात आले आहे. या स्मारकाचे उद्घाटन करण्यासाठी माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आले होते. त्यावेळी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम ठिकाणी येऊन जोरदार घोषणाबाजी केली.
तसेच रहदारीचा रस्ता अडवून काळे झेंडे दाखवत “फडणवीस गो बॅक-भाजप सरकार हाय हाय’ अशा घोषणा दिल्या. बेकायदा गर्दी जमवून जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.