पिंपरी – लिव्ह ऍन्ड रिलेशनशीपमध्ये राहत असलेल्या तरुणीचा खून करण्यात आला. ती तरुणी आणि तिची आई आपल्याला ब्लॅकमेल करीत असल्याने खून केला असल्याची माहिती आरोपीने पोलिसांना दिली. ही घटना विठ्ठलवाडी, आकुर्डी येथे रविवारी (दि. 6) सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
रितू भालेराव (वय 20) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी घरमालक प्रथमेश दीपक दरेकर (वय 25) यांनी रविवारी (दि. 6) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार श्याम राजू ढेरे (रा. विठ्ठलवाडी, आकुर्डी. मूळ रा. जालना) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी श्याम ढेरे आणि रितू भालेराव हे दोघेजण विठ्ठलवाडी येथे पती-पत्नी असल्याचे खोटे सांगून राहत होते. रितू आणि तिची आई आपल्याला खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत पैशाची मागणी करीत होते. या ब्लॅकमेलिंगला कंटाळून रितू हिचा खून केल्याचे आरोपी ढेरे याने पोलिसांना सांगितले.
खून केल्यावर रितू हिचा मृतदेह घरातील शौचालयात टाकला. त्यानंतर दोन दिवसांनी आरोपी ढेरे याने घरमालकाला फोन करून घरात मृतदेह असल्याबाबतचे सात मेसेज केले. त्यानंतर घरमालकाने पोलिसांना बोलावून पाहूणी केली असता खूनाचा हा प्रकार उघडकीस आला.