शिक्रापूर – येथील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या मैत्रिणीसह देवदर्शनाला घेऊन जाण्याच्या बहाण्याने कारमधून घेऊन जात तिला जबरदस्तीने दारू पाजून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सागर सुनील वर्पे याच्यावर ऍट्रॉसिटीसह बाललैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शिक्रापूर येथील पीडित अल्पवयीन मुलगी तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली असता सागर वर्पे हा कार घेऊन तिच्या मैत्रिणीच्या घरासमोर आला. दरम्यान हॉर्न वाजवून तिला व तिच्या मैत्रिणीला घराबाहेर बोलावून घेत आपण नारायणपूरला देव दर्शनाला जाऊ माझी पत्नीदेखील
माझ्यासोबत आहे, तुम्ही पण चला असे म्हणून कारमध्ये बसून घेऊन गेला. त्यानंतर शिक्रापूरपासून काही अंतर गेल्यानंतर सागर याने कोल्ड्रिंक्स आणि दारू घेतली आणि कारमध्ये बसून युवती व तिच्या मैत्रिणीला जबरदस्तीने दारू पाजली.
त्यानंतर युवतीला काही त्रास होऊ लागला, दरम्यान त्याचवेळी सागर हा तिच्याशी अश्लिल चाळे करू लागला. तसेच तुझे काही फोटो माझ्याकडे आहे ते मी सोशल मीडियावर व्हायरल करील अशी धमकी दिली. यावेळी पीडित मुलगी व तिच्या मैत्रिणीने आम्हाला घरी
सोड, आता आम्ही घरी फोन करू असे म्हटले असता त्याने काही वेळाने दोघी मैत्रिणींना त्यांच्या घरी आणून सोडले. यावेळी पीडित युवतीने घडलेला सर्व प्रकार तिच्या वडिलांना सांगितला. त्यानंतर शिक्रापूर पोलीस स्टेशन गाठत याबाबत फिर्याद दिली.