पिंपरी – पिंपळे सौदागर येथील किराणा दुकान फोडण्याचे प्रयत्न करणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला नागरिकांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना ही रविवार दि. 9 जून रोजी पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील लकी सुपर मार्केट या किराणा दुकानात घडली.
याप्रकरणी किरणा दुकानाचे मालक करण सखाराम चौधरी (वय-19 रा. पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून 17 वर्षीय अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांचे पिंपळे सौदागर येथे लकी सुपर मार्केट हे किराणा मालाचे दुकान आहे.
रविवारी रात्री ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करुन घरी गेले असता पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास अल्पवयीन मुलगा शटर उचकटण्याचा प्रयत्न करीत होता. हा प्रकार नागरिकांच्या निदर्शनास आला. त्यांनी मुलाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.