पुणे – 45 लाख 92 हजार रुपयांच्या फसवणूक प्रकरणी एक्सब्रिया डेव्हलपर्स कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल झाला आहे. प्रोजेक्टच्या कामाची वर्कऑर्डर देऊन त्याप्रमाणे काम करून घेतल्यानंतरही बिलाची रक्कम न देता विश्वासघात करून फसवणूक केल्याच्या आरोपाखाली कोथरूड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल नहार, राहुल नहार (दोघेही रा. मार्केटयार्ड), सचिन पाटील, नितीन सैद अशी गन्हा दाखल झालेल्या संचालकांची नावे आहेत. याप्रकरणी श्रीपाल धाडीवाल (वय 34, रा. गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रोड) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार 2015 ते 2016 दरम्यान घडला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक्सर्बिया डेव्हलपर्सच्या संचालकांनी फिर्यादी धाडीवाल यांना वरई, माडप, आंबी व ताडवाडी येथील प्रोजेक्टच्या कामाची ऑर्डर दिली होती. वर्कऑर्डरप्रमाणे काम पूर्ण झाल्यानंतर ठरलेली रक्कम दिली जाईल असे सांगितले होते. संचालकांनी फिर्यादी यांच्याकडून ऑर्डरप्रमाणे काम करून घेतले. कामाचे बिल 11 लाख 96 हजार 48 रुपये आणि प्रोजेक्टचे कामानंतर पूर्ण बिलाचे रक्कमेतून रिटेन्शन मनी म्हणून स्वत:कडे 33 लाख 96 हजार 188 रुपये ठेवले. एकूण 45 लाख 92 हजार 236 रुपये फिर्यादी धाडीवाल यांना न देता संचालकांनी विश्वासघात करून स्वत:साठी रक्कम वापरली.
आर्थिक फसवणूक करुन ग्राहकांकडून प्रोजेक्टसाठी घेतलेल्या रक्कमेचा संबंधित प्रोजेक्टच्या कामासाठी वापर न करता इतरत्र वापरुन विश्वासघात केला. याप्रकरणी श्रीपाल धाडीवाल यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार कोथरुड पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप करीत आहेत.