बारामती (प्रतिनिधी): शाळेत शिपायाची नोकरी लावतो असे अमिष दाखवून दोघांकडून 9 लाख 80 हजार रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी बारामतीतल यशोदीप कला-क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष महिलेसह तिच्या पतीवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याआधी सैन्य भरतीच्या फसवणुकी प्रकरणी पतीवर दोन गुन्हे दाखल असून आता हा तिसरा गुन्हा ठरला आहे.
अध्यक्षा रामेश्वरी नितीन जाधव व नितीन तानाजी जाधव असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. तर मंगलसिंग गारद्या वसावे (रा. काकडदा, ता. धनगाव, जि. नंदूरबार) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबतची माहिती अशी की, संस्थेने 2012 -13 मध्ये वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीवरून फिर्यादी मंगलसिंग वसावे व त्यांचा मेव्हणा संजय नरसिंग गावीत यांनी जाधव दांपत्यास संपर्क साधला. त्यानंतर तालुक्यातील कर्हावागज येथील मूकबधिर शाळेवर वसावे व गावित यांना बोलवण्यात आले. कर्हावागज तसेच लोणंद (ता. खंडाळा) येथील बाळू पाटलाची वाडी येथे मूकबधिर शाळा असल्याचे त्यांना सांगण्यात आले.
शिपाई पदासाठी 9 लाख रुपये द्यावे लागतील असे रामेश्वरी जाधव यांनी त्यांना सांगितले. नोकरीसाठी आलेल्या त्या दोघांनी रक्कम जास्त असल्याचे सांगितले. त्यानंतर पैसे दिले तरच नोकरी मिळेल असे त्यांना सांगण्यात आले. 10 दिवसांच्या कालावधीनंतर फिर्यादी व त्यांच्या मेहुण्याने चार लाख रुपये दिले. ही रक्कम स्वीकारत जाधव दाम्पत्याने पुढील पाच लाख रुपये रकमेसाठी त्यांना दोन महिन्यांची मुदत दिली.
खूप कष्टाने व उसनवारी करत या तरुणांनी पाच लाख रुपये त्यांच्या हवाली केले. त्यानंतर त्यांना स्वामी समर्थ निवासी मूकबधिर विद्यालय बाळू पाटलाची वाडी येथे शिपाई म्हणून नोकरीचे पत्र दिले. त्या ठिकाणी चार वर्षे काम करूनही पगाराचा पत्ता नव्हता. याबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली गेली. शिवमुद्रा नावाने आमची सहकारी पतसंस्था असून त्यामध्ये चार वर्षांत तर कम दाम दुप्पट होईल, असे सांगत 80 हजार रुपये भरण्यास भाग पाडले.
2017 मध्ये या तरुणांनी नोकरी सोडली. त्यानंतर या दाम्पत्याने पैशाची मागणी केली. आरोपींनी नऊ लाख रुपयांचा आयसीआयसीआय बँकेचा धनादेश त्यात तरुणांच्या हाती दिला. मात्र, अद्यापपर्यंत तो वाटलाच नाही. पैशाची मागणी होतास प्रत्येक वेळेस आरोपींनी वेळ मारून नेली, असे फिर्यादित नमूद केले आहे.
‘त्या’मुळे भिंग फुटले
बारामती येथे सैन्यदला तील नोकरीच्या आमिषाने फसवणूक अशा प्रकारची बातमी वृत्तपत्रात वाचली त्यानंतर या फसवणूक झालेल्या तरुणांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यामुळे सैन्यभरतीच्या घोटाळ्यामुळे आणखी किती भिंग फुटणार हे पाहावे लागणार आहे.