पुणे -पुण्यातील एका रुग्णालयातून सात किलोमीटरवरील दुसऱ्या रुग्णालयात जाण्याकरिता शरद बेडादे या व्यक्तीस संजीवनी ऍम्ब्युलन्स सर्व्हिसेसच्या चालकाने तब्बल 8 हजार रुपये भाडे घेतल्याचा प्रकार समोर आला होता.
त्यानंतर याबाबतची गंभीर दखल प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) घेतली. आरटीओचे अधिकारी धनंजय गोसावी यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात रुग्णवाहिका चालकाविरोधात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला आहे. आरटीओने किलोमीटरनुसार सर्व रुग्णवाहिका चालकांचे किफायतशीर दर निश्चित केल्याने यापुढील काळात गरजूंना दिलासा मिळणार आहे.
हडपसर येथील मयूर दिलीप पुस्तके यांची गाडी प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे मोबाइल क्लिनिक व्हॅन या संवर्गात नोंदणी झाली असताना संजीवनी ऍम्ब्युलन्स सर्व्हिस यांनी रुग्णांकडून जादा भाडे आकारून शासनाची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे.