जस क्रिकेट अकादमी करंडक निमंत्रित टी-20 क्रिकेट स्पर्धा
पुणे – शिव हरपाळे याने केलेल्या उपयुक्त 45 धावांच्या खेळीच्या जोरावर जस क्रिकेट अकादमी (अमनोरा) संघाने एफ3 क्रिकेट अकादमीचा 104 धावांनी पराभव करून येथे होत असलेल्या युनायटेड स्पोर्टस क्लब आणि जस क्रिकेट अकादमी यांच्या तर्फे आयोजित जस क्रिकेट अकादमी करंडक 14 वर्षांखालील निमंत्रित टी-20 प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत आगेकूच केली.
धानोरी येथील प्रकाश टिंगरे मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्यांदा फलंदाजी करताना जस क्रिकेट अकादमी(अमनोरा) संघाने 20 षटकांत 5 गड्यांच्या बदल्यात 200 धावांचा डोंगर रचला. यात शिव हरपाळे 45 धावा, रणवीर सिंग चौहान नाबाद 33 धावा, परम अभुदया 27 धावा, श्रेयश यादव 29 धावा, सौमिल दाभोलकर 20 धावा यांनी संघाला भक्कम धावसंख्या उभारून दिली.
प्रत्युत्तरात खेळताना एफ3 क्रिकेट अकादमी संघाला 20 षटकांत 8 बाद 96 धावांपर्यंतच मजल मारता आली. यामध्ये ओम काळे 21, अरुण कुऱ्हे 19, यश कुंभार 12 यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. यावेळी जस क्रिकेट अकादमी संघाकडून तनिश बागा, माहीर रावळ, सुरज दोर्गे आणि परम अभुदय यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. शिव हरपाळे याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
सविस्तर निकाल:
साखळी फेरी – जस क्रिकेट अकादमी (अमनोरा) – 20 षटकांत 5 बाद 200 (शिव हरपाळे 45, रणवीर सिंग चौहान नाबाद 33, परम अभुदया 27, श्रेयश यादव 29, सौमिल दाभोलकर 20, पार्थ दानवे 1-23, व्योम चहल 1-38) वि.वि. एफ3 क्रिकेट अकादमी – 20 षटकांत 8 बाद 96 (ओम काळे 21, अरुण कुऱ्हे 19, यश कुंभार 12, तनिश बागाने 1-8, माहीर रावळ 1-7, सुरज दोर्गे 1-5, परम अभुदया 1-22), सामनावीर-शिव हरपाळे.