पुणे – एनपी-एव्ही आयोजित पहिल्या एनपी-एव्ही आंतर आयटी क्रिकेट करंडक स्पर्धेत साखळी फेरीत सिमेंस, ऍमडॉक्स, विप्रो या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजयी सलामी दिली. या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या अतुल पवार याने केलेल्या 87 धावांच्या खेळीच्या जोरावर सिमेंस संघाने आयडीयाज संघाचा 47 धावांनी पराभव केला.
प्रथम फलंदाजी करताना सिमेंस संघाने 20 षटकात 3 बाद 209 धावांचे आव्हान उभे केले. यात अतुल पवारने सुरेख फटकेबाजी करत 55 चेंडूत 12 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 87 धावांची खेळी केली. अतुल याला हिमांशू अगरवालने 48 चेंडूत 78 धावा करून सुरेख साथ देत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. हे आव्हान आयडीयाज संघ पेलू शकला नाही. त्यांना 20 षटकात 6बाद 162 धावापर्यंतच मजल मारता आली. यात अरुण सिंग 48, प्रसाद कुंटे 24, रौनक तौनक नाबाद 33 यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. सिमेंस संघाकडून मनोज भागवतने 28 धावात 3 गडी बाद केले.
दुसऱ्या सामन्यात नवीन कटारिया (नाबाद 78 धावा) याच्या अफलातून फलंदाजीच्या जोरावर ऍमडॉक्स संघाने सनगार्ड संघाचा 23 धावांनी पराभव करून पहिला विजय मिळवला. तिसऱ्या सामन्यात सुशांत सिन्हा (3-18) याने केलेल्या गोलंदाजीच्या जोरावर विप्रो संघाने व्हेरिटास संघाचा 4 गडी राखून पराभव करत विजयी सलामी दिली.