क्रिकेट कॉर्नर: अपयशी… ऍरन फिंच

जिंकण्यासाठी काय वाट्टेल ते करण्याचा दृष्टिकोन असलेल्या ऑस्ट्रेलियाचा मर्यादित षटकांच्या सामन्यांचा कर्णधार ऍरन फिंच आता टीपिकल व्यावसायिक मानसिकतेचा बनला की काय अशी शंका येत आहे. व्यावसायिक मानसिकतेचा म्हणजे पूर्वपुण्याईवर आपले दुकान सुरू ठेवण्याची भावनाशून्य मानसिकता.
आयपीएल स्पर्धा सुरू झाली त्याला एक तप पूर्ण झाले. यंदा स्पर्धेचे तेरावे वर्ष आहे. या कालावधीत फिंच सर्वच्या सर्व आठही संघांकडून खेळला आहे.

अशी कामगिरी करणारा तो स्पर्धेच्या इतिहासातील एकमेव खेळाडू आहे. मात्र, त्यामागे नकोशा कामगिरीची नोंद आहे. मुळातच आक्रमक खेळासाठी प्रसिद्ध असलेला फिंच या स्पर्धेत खेळत असताना एकाही संघात फार काळ टिकू शकला नाही व याला कारण त्याची सुमार कामगिरी. यंदाच्या स्पर्धेतील त्याची कामगिरी पाहिली तर खुद्द ऑस्ट्रेलियाच्या संघातही त्याची निवड केली जाईल का नाही अशीच शंका येते.

या स्पर्धेत त्याने आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत व केवळ 21.45 च्या सरासरीने केवळ 236 धावा केल्या आहेत. त्याला केवळ एकच अर्धशतकी खेळी करण्यात यश आले आहे. स्पर्धेत खेळत असलेल्या नवोदित संजू सॅमसनच्या धावा त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त आहेत. मग अशा कामगिरीच्या खेळाडूला डावलून फिंचला इतकी वर्षे विविध संघांनी कोणत्या निकषांवर आपल्या संघात घेतले.

केवळ ऑस्ट्रेलियाचा आहे म्हणून. यंदा किंग्ज इलेव्हन पंजाबनेही अशाच विचाराने कदाचित ग्लेन मॅक्‍सवेलला आपल्या संघात घेतले असावे. कामगिरी शून्य पण मानधन करोडो रुपयांचे अशी स्थिती आहे. यंदा फिंच रॉयल चॅलेंजर बेंगळुरूकडून या स्पर्धेत खेळत आहे.

खरेतर खेळत आहे का खेळल्यासारखे दाखवत आहे हेदेखील एक मोठे कोडे आहे. प्रत्यक्ष दोन महिने चालत असलेल्या या स्पर्धेत खेळून गब्बर श्रीमंत होण्यासाठीच काही खेळाडू तत्पर असतात, फिंचही त्यातीलच एक. फिंचला यंदा बेंगळुरूने 4.4 कोटी रुपयांना विकत घेतले व विकतचे दुखणे बेंगळुरूच्याच मागे लागले आहे. संघाच्या सराव सत्रात त्याची फटकेबाजी दिसून येते.

मात्र, प्रत्यक्ष सामन्यांत त्याचे तंत्र उघडे पडताना दिसत आहे. त्याला स्लोअर वन, स्विंग तसेच अवे स्विंगर चेंडूंवर सातत्याने अपयश येत आहे. त्याची मानसिकता खरेच ऑस्ट्रेलियन आहे का असा प्रश्‍न निर्माण होत आहे. ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू सामन्यात अपयशी ठरले तर आपल्याच आधीच्या सामन्यांचे रेकॉर्डिंग पाहून सरावात चूका दूर करण्यासाठी मेहनत घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. फिंचच्या बाबतीत मात्र, हे दिसत नाही. बेंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहली व प्रमुख फलंदाज एबी डीविलियर्ससारखे फलंदाज संघात असताना फिंच त्यांच्याकडून काहीही शिकू शकला नाही याचेही आश्‍चर्य वाटते.

राजस्थान, दिल्ली, पुणे, हैदराबाद, मुंबई, पुन्हा पुणे, पंजाब आणि यंदा बेंगळुरू अशा आठ संघांकडून तो खेळला. स्पर्धेच्या इतिहासात त्याने 86 सामने खेळले आहेत. त्यात 14 अर्धशतकांच्या मदतीने 1976 धावा केल्या आहेत. म्हणजेच यंदाच्या मोसमात पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने एकाच मोसमात जवळपास सातशे धावा केल्या आहेत, यावरूनच फिंचच्या अपयशाची खात्री पटते. या धावा करताना त्याची सरासरी केवळ 29 च्या आसपास आहे म्हणजेच त्याने कामगिरीत नव्हे तर अपयशात सातत्य राखले आहे.
यंदाच्या स्पर्धेतील त्याच्या कामगिरीत उर्वरित सामन्यांत सुधारणा झाली तरच पुढील वर्षी मार्च महिन्यात होणाऱ्या आयपीएलमध्ये तो दिसेल अन्यथा त्याला आयपीएलमधून बायबाय करावे लागेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.