क्रिकेट काॅर्नर : करोनाच्या नियमांची ऐशीतैशी

-अमित डोंगरे

अहमदाबादच्या जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानावर बुधवारपासून सुरु झालेल्या कसोटी सामन्याचा गाजावाजा मोठा झाला. त्यातही देशाचे राष्ट्रपती तसेच केंद्रिय गृहमंत्री अमित शहा तसेच अनेक मोठ्या पदांवरील व्यक्तींच्या उपस्थितीत नव्या कोऱ्या नरेंद्र मोदी मैदानाचे उद्घाटन थाटामाटात पार पडले. इथे एक गोष्ट नमुद करावीशी वाटते की यावेळी करोनाबाबतची कोणतीही काळजी घेण्यात आलेली प्रेक्षक गॅलरीमध्ये दिसली नाही. असे का, असा प्रश्‍न क्रिकेट रसिकांना पडल्यावाचून राहिला नाही.

जगभरात गेल्या वर्षापासून धुमाकूळ घालत असलेल्या करोनाने देशाच्या अर्थव्यवस्थेला खिंडार पाडले. त्यानंतर परिस्थिती हळूहळू मुळ पदावर येऊ लागली व देशात क्रीडा स्पर्धांचे विशेषतः क्रिकेटचे वारे पुनश्‍च वाहू लागले. मात्र, त्यासाठी बीसीसीआयने मोठी तयारी करत करोनाबाबतचे नियम तयार केले. त्याला साथ देत आयसीसीनेही करोनाबाबतचे नवे नियम लागू केले.केवळ खेळाडूच नव्हे तर सामना पाहण्यासाठी येत असलेल्या प्रेक्षकांनाही त्याचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक करण्यात आले. असे असतानाही बुधवारी सामना सुरू झाल्यापासून प्रेक्षकांना करोनाचे कोणतेही गांभीर्यच नसल्याचे दिसून आले.

या मैदानाची प्रेक्षक क्षमता एक लाख 10 हजार इतकी प्रचंड आहे. तरीही त्याच्या निम्म्याच प्रेक्षकांना म्हणजे 55 हजार प्रेक्षकांना मैदानात प्रवेश देण्यात येणार होता. पहिल्या दिवशीतरी तेवढे प्रेक्षक नव्हते.
पहिल्या दिवशी इंग्लंडचा 112 धावांत बट्ट्याबोळ झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर आता दुसऱ्या दिवशी मैदानावर तिकिट खरेदी करण्यासाठी रांग लागली. पहिल्या दिवशीही रांग होती मात्र, ती तिकिटांसाठी नव्हे तर आपल्या लाडक्‍या खेळाडूंना जवळपास 11 महिन्यांनंतर पाहण्यासाठी.

या सामन्यासाठी संपूर्ण मैदानात आसनांची कायम स्वरुपी व्यवस्था करण्यात आली असल्याने एकदा मैदानात पाऊल ठेवले की आपण इंग्लंड, ऑस्ट्रेलिया वगैरे देशांत सामना पाहतो आहोत असा भास होतो. मात्र, खेळाडूंच्या ड्रेसिंग रुम किंवा डगआऊटच्या शेजारी असलेल्या प्रेक्षक गॅलरीकडे नजर गेली की आपण भारतातच असल्याची खात्री पटते. इतकी बेजबाबदार वृत्ती प्रेक्षक गॅलरीत अन्य कोणत्याही देशांत दिसणार नाही. करोना अद्याप कायम आहे. इतकेच नव्हे तर त्याचे स्वरुपही बदलले आहे, तो वाढतानाही दिसत आहे. मात्र, आपल्याला काय त्याचे असेच वर्तन प्रेक्षकांचे हा सामना पाहताना दिसून येत आहे.

मैदानात खेळाडू तसेच सपोर्ट स्टाफसाठी किंवा विशेष निमंत्रीत व्यक्तींच्या कॅरीडॉरमध्ये तसेच संपूर्ण खेळण्याच्या एरियात बायोबबल सुरक्षा व्यवस्था सज्ज आहे. मात्र, प्रेक्षक गॅलरीत जे प्रेक्षक उपस्थित आहेत, त्यांच्याकडून ना सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत आहे ना ते मास्कचा वापर करत आहेत.
मग करोना त्यांच्या घरी जाणारच आहे. तसेच त्यांना कॅरिअर बनवून हाच करोना संपूर्ण अहमदाबाद शहरात पसरण्याचाही धोका व्यक्त केला गेला आहे. तरीही हम नहीं सुधरेंगे असेच वर्तन स्पष्टपणे दिसत आहे. यावर कोणाचेही नियंत्रण आहे किंवा नाही हे देखील समजत नाही. नियंत्रण ठेवण्याच्या सुचनाही दिल्या आहेत का सरळ सरळ दुर्लक्ष करण्याच्या सुचना दिल्या गेल्या आहेत ते देखील कोडेच आहे.

हा सगळा प्रकार पत्रकार, विविध वृत्त वाहिन्या तसेच प्रसिद्धी माध्यमे आणिवृत्त संस्थांचे प्रतिनिधि हे देखील पाहत आहेत. मात्र, एकाकडूनही यावर बातमी प्रसिद्ध झालेली दिसली नाही याला प्रसिद्धीपूर्व नियंत्रण समजावे का. या सामन्याच्या पहिल्या दोन दिवसांच्या अनुभवावरून तरी आयसीसी व बीसीसीआय कठोर पाऊले उचलणार का हाच काय तो प्रश्‍न आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.