मुंबई – विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन यंदा दहा दिवस होणार आहे. 1 ते 10 मार्च असे दहा दिवस अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी असणार आहे. तसेच 8 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असून 9 आणि 10 मार्च रोजी बजेटवर चर्चा होणार आहे. त्यानंतर अधिवेशन समाप्त होईल. यंदाच्या अधिवेशनात अशासकीय ठराव तसेच लक्षवेधी होणार नाही.
वर्ष 2020च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पहिल्यांदा करोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आढळायला लागले. त्यामुळे अर्थसंकल्प मांडल्यानंतर ते अधिवेशन गुंडाळण्यात आले होते. एक वर्षांनी पुन्हा करोनाच्या संकटामुळे अधिवेशनाचा कार्यकाळ कमी करावा लागला आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचे अनेक मुद्दे आहेत. शिवसेना मंत्री संजय राठोड, वीज बिल, करोना रुग्णांची वाढती संख्या. पण सरकारला कामकाज करायचे नाही म्हणून कमी काळ अधिवेशन घेणार असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.
दरम्यान, अधिवेशनाच्या कार्यकाळाबाबत आज कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. भाजपचे देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार विरुद्ध शिवसेनेचे अनिल परब यांच्यात जोरदार घमासान झाले. अधिवेशनात करोना दिसतो, संजय राठोड यांच्या शक्तीप्रदर्शनाच्यावेळी करोना दिसला नाही का? असा प्रश्न विचारत दादागिरी खपवून घेणार नाही, असा इशाराही भाजप नेत्यांनी सरकारला दिला.
विरोधकांचा वॉकआऊट
दरम्यान या खडजंगीनंतर विरोधक कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीतून बाहेर पडले. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “राज्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. सरकारला कुठलीही चर्चा करण्यास रस नाही. करोनाची भीती दाखवून अधिवेशन गुंडाळण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सरकारच्या पळपुटेपणाचा निषेध करत आम्ही बैठकीतून वॉकआऊट केला, असे त्यांनी सांगितले.
असे होणार अधिवेशन?
– पहिला दिवस (1 मार्च) – राज्यपालांचे अभिभाषण, अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शन प्रस्ताव
– दुसरा, तिसरा दिवस (2 मार्च, 3 मार्च) – राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा
– चौथा, पाचवा दिवस – (4 मार्च, 5 मार्च) – पुरवणी मागण्यांवर चर्चा आणि मतदान
– सहावा, सातवा दिवस (6 मार्च, 7 मार्च) – शनिवार, रविवारची सुट्टी
– आठवा दिवस (8 मार्च) – अर्थसंकल्प सादर होणार
– नववा दिवस (9 मार्च) – शासकीय कामकाज
– दहावा दिवस (10 मार्च) – अर्थसंकल्पावर चर्चा, अधिवेशनाची सांगता