क्रिकेट काॅर्नर : फिरकीचे भूत उतरणार का?

– अमित डोंगरे

चेन्नईला मालिकेत बरोबरी केल्यावर अहमदाबादमध्ये दाखल झालेल्या भारत व इंग्लंड या दोन्ही संघांच्या मानगुटीवर फिरकी गोलंदाजीचे भूत बसले. त्यात भारतीय संघाच्या बाजूने तिसऱ्या कसोटीत निकाल लागल्याने आता ही मालिका बरोबरीत राखण्यासाठी इंग्लंडलाच जास्त मेहनत करावी लागणार आहे. तर हा सामना बरोबरीत सुटला किंवा गमावला तरीही भारतीय संघच फायद्यात राहणार आहे. मात्र, गुरुवारपासून सुरू होत असलेल्या चौथ्या कसोटीत तरी दोन्ही संघांच्या मानगुटीवर बसलेले फिरकी गोलंदाजीचे भूत उतरणार का, हाच काय तो मुख्य प्रश्‍न आहे.

येथेच प्रकाशझोतात झालेला गुलाबी चेंडूवरचा पाच दिवसांचा कसोटी सामना केवळ दोनच दिवसांत संपल्यामुळे जरी खेळपट्टीवर टीका होत असली तरी त्यात काहीही तथ्य नाही. फलंदाजांनी टी-20 क्रिकेटची मानसिकता जोर धरू लागल्याने तंत्रशुद्ध फलंदाजी एखाद्या संग्रहालयातच पाहावी लागणार का असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

या कसोटीत तरी दोन्ही संघांतील फलंदाज जबाबदारीने फलंदाजी करणार का, हा प्रश्‍न आहे. तिसऱ्या कसोटीत पहिल्याच दिवशी चेंडूला जी फिरकी मिळत होती ते पाहता चौथ्या कसोटीतही काही वेगळी परिस्थिती असेल असे वाचत नाही. मात्र, आयसीसीने कठोर भूमिका घेऊ नये यासाठी तशीच खेळपट्टी तयार करण्याची हिंमत बीसीसीआय दाखवणार नाही हे निश्‍चित त्यामुळे पाटा खेळपट्टीचा पर्याय सर्वोत्तम राहणार आहे.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने तिसऱ्या कसोटीसाठी खेळपट्टी त्याला हवी तशी बनवली गेली असे बोलले जाते. त्यात काहीसे तथ्य नक्कीच असेल कारण अशा सूचना प्रत्येक देशाच्या कर्णधार आपल्या देशात सामना खेळताना देत असतो. या मालिकेतील पहिले दोन कसोटी सामने चेन्नईत झाले. त्यात देन्ही संघांनी एकेक सामना जिंकला व अहमदाबादचा तिसरा सामना जिंकत भारतीय संघाने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. या सामन्यात नीचांकी धावा झाल्या. मात्र, इंग्लंडचा सलामीवीर जॅक क्राऊलीने तर भारताचा सलामीवीर रोहित शर्माने अर्धशतकी खेळी केली. या संपूर्ण सामन्यात ही दोनच अर्धशतके नोंदली गेली.

दोन्ही संघांतील बलाढ्य फलंदाज फिरकीच्या जाळ्यात आडकले. अर्थात, इंग्लंडच्या जॅक लीचने आतापर्यंत झालेल्या सामन्यांत आणि त्यांचा कर्णधार ज्यो रूट याने तिसऱ्या सामन्यात आपल्या फिरकी गोलंदाजीच्या जोरावर भारताच्या प्रमुख फलंदाजांवर वर्चस्व राखले. भारताच्या बाबतीत बोलायचे झाले तर रविचंद्रन अश्‍विन व अक्‍सर पटेल यांनी दोन्ही डावांत मिळून एकूण 18 गडी बाद केले. म्हणजेच या संपूर्ण सामन्यावर फिरकी गोलंदाजांचाच प्रभाव राहिला.

अजूनही या सामन्यासाठी तयार केलेल्या खेळपट्टीवरून सुरू असलेले कवित्व संपलेले नाही. दोन्ही संघांच्या मानगुटीवर फिरकी गोलंदाजीचे भूत बसल्याचेच स्पष्ट झाले आहे. आता खेळपट्टीबाबत सांगायचे तर दोन्ही संघांतील फलंदाजांनी खेळपट्टीचा विनाकारण बाऊ केला. अशा खेळपट्ट्या भारतात असतातच. खरे कारण हे आहे की याचे भूत मानगुटीवर बसल्याने अनावश्‍यक फटके खेळून दोन्ही संघातील खेळाडूंनी आपल्या विकेट गमावल्या आहेत. आता चौथ्या कसोटीत तरी हे खेळपट्टी किंवा फिरकी गोलंदाजीचे भूत मानगुटीवरून उतरणार का, हेच पाहणे लक्षवेधी ठरणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.