#INDvENG 4th Test : खेळपट्टी व फिरकीचेच आव्हान

भारत व इंग्लंडदरम्यान आजपासून महत्त्वपूर्ण चौथी कसोटी

अहमदाबाद – खेळपट्टी आणि फिरकी गोलंदाजीमुळे तिसऱ्या कसोटीत त्रस्त झालेल्या भारत व इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यास आजपासून येथे प्रारंभ होत आहे. या सामन्यासाठी आता कशी खेळपट्टी असेल याचेच आव्हान आता दोन्ही संघांसमोर राहणार आहे.

तिसरी कसोटी दिवस-रात्र पद्धतीने गुलाबी चेंडूने खेळवली गेली होती. मात्र, या चेंडूचा लाभ वेगवान गोलंदाजांनाच होतो हा समज त्या सामन्यात खोटा ठरला. तसेच खेळपट्टीने पहिल्या दिवसापासूनच फिरकीला साथ दिली. या सामन्यात दोन्ही संघांतील वेगवान गोलंदाजांना पार्टटाईम गोलंदाजांइतकीच षटके गोलंदाजी मिळाली. त्यांच्या संघातील जेम्स ऍण्डरसनसह जोफ्रा आर्चरलाही फारशी संधी मिळाली नाही.

तसेच भारताच्या जसप्रीत बुमराह व इशांत शर्मा यांनाही पहिल्या दिवशी नव्या चेंडूवर काही षटके गोलंदाजी मिळाली. त्यानंतर मात्र, संपूर्ण दिवस फिरकी गोलंदाजांकडेच गोलंदाजीची सूत्रे होती. याच मैदानावर मुख्य खेळपट्टीच्या शेजारील ट्रॅकवर आता चौथी कसोटी होणार असली तरीही खास मुंबईवरुन आणलेल्या मातीने तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीबाबतही दोन्ही संघांना धास्ती आहे.

मुळात या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी चेन्नईच्या लाल मातीच्या ट्रॅकवर खेळवल्या गेल्या. आता अहमदाबादलाही तीच परिस्थिती आहे. त्यातच तिसरा कसोटी सामना नीचांकी धावसंख्येचा झाल्यामुळे या सामन्यासाठी तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीवरूनही दोन्ही संघांतील फलंदाजांना चिंतेने ग्रासले आहे.

भारताबाबत बोलायचे झाले तर त्यांची बाजू काहीशी वरचढ आहे. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाला मायदेशात खेळण्याचा फायदा होणार असला तरीही या आधीच्या कसोटीत रोहित शर्मा, कर्णधार कोहली व शुभमन गिल यांचा अपवाद वगळता अन्य एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर उभे राहता आले नाही.

कोहलीदेखील धावा करत असला तरीही त्याच्या दर्जाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्याला गेल्या वर्षभरापेक्षाही जास्त कालावधीत एकही शतकी खेळी करता आलेली नाही. तसेच ऑस्ट्रेलियात सातत्यपूर्ण कामगिरी केलेल्या चेतेश्‍वर पुजारा, ऋषभ पंत यांनाही या मालिकेत छाप पाडता आलेली नाही. इंग्लंडचा जॅक लिच व कर्णधार ज्यो रूट यांच्या गोलंदाजीवर त्यांना येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीत अपयश आल्याने आठव्या क्रमांपर्यंत फलंदाजी असलेल्या भारतीय संघाला द्विशतकी धावाही करता आल्या नाही. रोहितने अर्धशतक फटकावले नसते तर भारतीय संघाची अवस्था इंग्लंडपेक्षा वेगळी दिसली नसती. फलंदाजीपेक्षा या मालिकेत आपल्या गोलंदाजांनी सरस कामगिरी केली आहे. वेगवान गोलंदाजांपेक्षाही जास्त चमकदार यश फिरकी गोलंदाजांनी मिळवले आहे.

या कसोटीत बुमराह नसल्याने त्याच्या जागी उमेश यादव किंवा महंमद सिराज यांना जरी संधी देण्यात आली तरीही त्यांच्या वाट्याला किती षटके येतील हे सांगता येत नाही. अश्‍विन व अक्‍सर पटेल यांच्या जोडीला आणखी एक फिरकी गोलंदाज संघात येणार हे जवळपास निश्‍चित आहे. ही खेळपट्टी फिरकीला साथ देईल. मात्र, तिसऱ्या कसोटीसारखी अनाकलनीय नसेल असे संकेत खुद्द अजिंक्‍य रहाणेनेच दिल्यामुळे या सामन्यात मोठी धावसंख्या उभारली जाण्याची शक्‍यताही आहे.

इंग्लंडच्या भारतातील कामगिरीचा आढावा घेतला तर केवळ 2012 सालची मालिका वगळता त्यांची फिरकी गोलंदाजीवर पळताभुई झाल्याचेच इतिहास सांगतो. या सामन्यात भारतीय संघात एखाद दुसरा बदल करण्यात येईल, मात्र, सामन्यावर भारतीय संघाचेच वर्चस्व राहील.

इंग्लंडची फलंदाजी तगडी आहे. मात्र, ज्यो रूट, जॅक क्राऊली, बेन फोक्‍स व काही प्रमाणात बेन स्टोक्‍सचा अपवाद वगळता या मालिकेत त्यांच्या अन्य फलंदाजांना सातत्याने अपयश आले आहे. ज्याच्याकडून सर्वात जास्त अपेक्षा आहेत तो स्टोक्‍सही वारंवार अपयशी ठरत आहे.

सलामीवीर जॉनी बेअरस्टो याचे अपयशही त्यांची चिंता वाढवणारे ठरत आहे. अश्‍विनसह एकूणच भारतीय फिरकी त्रिकुटाचा सामना करण्यासाठी त्यांना अत्यंत जबाबदारीने तसेच संयमी केळ करावा लागणार आहे. त्यांच्या फलंदाजीची सर्व मदार कर्णधार रूटवरच आहे. त्यांची गोलंदाजी अनुभवी असली तरीही फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर त्यांची प्रमुख मदार लिचची फिरकी व रूटची पार्टटाईम गोलंदाजी यांच्यावरच राहणार आहे.

जड रोलर वापरल्यामुळे फलंदाजांनाही संधी

तिसऱ्या कसोटीप्रमाणे चौथ्या कसोटीसाठीची खेळपट्टीही फिरकी गोलंदाजीला मदत करणारीच असेल. मात्र, गेल्या दोन दिवसांत जड रोलरने खेळपट्टीचे रोलिंग केले गेले आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी खेळपट्टीवर पाणीही फवारले गेले आहे. हा सामना नेहमीप्रमाणे सूर्यप्रकाशात व पारंपरिक लाल चेंडूवरच खेळवला जाणार असल्याने पहिल्या व दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात वेगवान गोलंदाजांना मदत मिळेल. तसेच उर्वरित दिवशी फिरकी गोलंदाज जरी वर्चस्व गाजवतील असे सांगितले जात असले तरीही ही खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन ठरेल. उन्हाळा नुकताच सुरू झाला असल्याने खेळपट्टीवर पडणारे दव फलंदाजांसाठी फारसे त्रासदायक ठरणार नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.