अबाऊट टर्न : “भाई’गर्दी

-हिमांशू

अबब! भाई, केवढी हो गर्दी ही! गर्दीत शिरायचं म्हटलं तरी काळजात चर्र होतं अशा या करोनाच्या भीषण काळात ही अलोट गर्दी केवळ तुमच्या प्रेमाखातर जमली बरं का भाई! काय त्या घोषणा, काय तो मोटारींचा ताफा आणि काय ती मिरवणूक! पुणे असो की मालेगाव, कायमची सुटका असो वा जामिनावरची हंगामी मुक्‍तता, सर्वत्र एकच चित्र… भाईच आमचा सगळ्यात जवळचा मित्र!

तुमच्या टोलेजंग मिरवणुका पाहून आमचा करोनावरचा विश्‍वास तर उडालाच; शिवाय पेट्रोल-डीझेलची दरवाढ हीसुद्धा अंधश्रद्धा आहे, हे कळलं. “वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’पासून “मुळशी पॅटर्न’पर्यंत अनेक चित्रपटांमधून आम्ही भाईवर प्रेम करणारी सामान्य माणसं पाहिली. भाईवर जान कुर्बान करू पाहणारी लहान-मोठी पोरंही पाहिली. पण प्रत्यक्षात या प्रेमाचं दर्शन अलीकडच्या दोन घटनांमधूनच घडलं. पहिली घटना पुण्याची आणि दुसरी मालेगावची.

पुण्यातल्या मिरवणुकीत तर गाड्या मोजणारी माणसं दमली; पण गाड्या संपल्या नाहीत असं सांगितलं जातंय! पत्रकारांनीही शेवटी गाड्यांचा अंदाजे आकडाच टाकला म्हणे बातमीत! हे खरं समर्थन आणि हीच खरी हुकूमत! हजारोंच्या मनावर अधिराज्य गाजवणं म्हणजे काय, याचं “याचि देही याचि डोळा’ ज्यांना दर्शन घडलं ते भाग्यवंत होत. या आकर्षणाचं मूळ शोधण्याच्या भानगडीत कुणी पडणार नाही, भाई, निश्‍चिंत राहा!

एवढी अमाप लोकप्रियताच तुम्हा मंडळींना अंतिमतः राजकारणाच्या दिशेनं घेऊन जात असावी. “भावी आमदार’ म्हणून पोस्टर लावणारे भाई आम्ही सिनेमात पाहतोच की! बाकी काही म्हणा, सिनेमावाल्यांचं पण तुमच्यावर उदंड प्रेम. एखाद्या शाळेचं किंवा कॉलेजचं चित्रण सिनेमावाल्यांना कदाचित इतकं परफेक्‍ट जमणार नाही; पण अंडरवर्ल्ड अगदी हुबेहूब साकारतात. आमचं आकर्षण वाढवतात. लोकप्रियता मिळवून राजकारणात जाण्यापूर्वीच तुम्ही मंडळी राजकारणातल्या अदृश्‍य शक्‍ती असता असं आम्ही ऐकून आहोत.

म्हणजे तुमच्या पाठबळाशिवाय लोकप्रतिनिधी बनताच येत नाही, म्हणे कुणाला! मग तो कॉर्पोरेटर असो किंवा आमदार. खरं-खोटं ठाऊक नाही; पण तुमच्या मिरवणुकीतसुद्धा काही गाड्या राजकारणी मंडळींच्या होत्या असं छापून आलंय. किती कृतकृत्य वाटत असेल ना तुम्हाला? आतापर्यंतची खडतर वाटचाल, संघर्ष, हेवेदावे, शत्रुत्व, या क्षेत्रात जम बसवण्यासाठी घेतलेले परिश्रम, पोलिसांचा ससेमिरा, भोगलेला तुरुंगवास हे सगळं फळाला आल्यासारखं वाटत असेल अशा वेळी! मिरवणुकांची जरा जास्तच वाच्यता झाली आणि तुम्हाला अंडरग्राउंड व्हावं लागलं हा भाग वेगळा! आता काही गंभीर कायदे आणि कलमं तुमच्यावर लावली जाणार आहेत, असंही कळतं. पण “प्रमोशन’ म्हणूनच तुम्ही ते स्वीकारालं याची खात्री वाटते.

भाई, मनापासून सांगू? पुणं असो की मालेगाव, मिरवणुकीतली गर्दी असं सांगतेय की तुम्ही आता सक्रिय राजकारणात उतरायला हवं. “राजकारणात गुन्हेगारीचा शिरकाव’ हा विषय काही वर्षांपूर्वी गांभीर्यानं चर्चिला जात होता, हे खरंय. पण लोकप्रतिनिधीगृहांमध्ये तुमची संख्या जसजशी वाढत गेली तसतशी ही चर्चाही बोथट होत गेली. तुमच्याशिवाय गत्यंतर नाही हे आता सगळ्यांनाच कळून चुकलंय. लोकप्रतिनिधींच्या आधी आम्हाला ते समजलंय! म्हणूनच तर आम्ही तुमच्याभोवती गर्दी जमवण्याचा आतापासूनच सराव करतोय.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.