जंतुनाशक फवारणी करण्यासाठी ड्रोनची निर्मिती

मुंबई : करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्जंतुकीकरणावर अधिक भर दिला जात आहे. साध्या हाताने पुसण्यापासून ते मोबाइल स्प्रे पद्धतीचा वापर करून सार्वजनिक जागांचे निर्जंतुकीकरण करण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर केले जात आहेत. सध्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया राबवली जाते आहे. मात्र मोठ्या भूभागाचे निर्जंतुकीकरण करण्यात अडचणींना सामोरे जावे लागते आहे.

ही अडचन दूर करण्याच्या हेतूने गरुडा एरोस्पेस या कंपनीने सार्वजनिक जागा, रुग्णालये आणि उंच इमारतींच्या स्वच्छतेच्या कामात मदत करण्यासाठी स्वयंचलित जंतुनाशक ड्रोन विकसित केले आहे. करोना-किलर’ नाव असणाऱ्या या ड्रोनचा वापर 450 फुटांपर्यंतच्या इमारतींवर जंतुनाशक फवारणी करण्यासाठी केला जाऊ शकतो.

कामगारांपेक्षा ड्रोनने केलेली ही फवारणी जलद, दीर्घकालीन आणि सुरक्षित असेल. तसेच ड्रोनप्रमाणे उंचावर फवारणी करणे कामगारांना शक्‍य नसते. त्याचाही फायदा ड्रोनच्या वापरामुळे होतो आहे. चंदीगड आणि वाराणसीमधील भागात निर्जंतुकीकरण करण्यासाठी हे ड्रोन यापूर्वीच तैनात करण्यात आले आहेत. हे ड्रोन पेटंट ऑटोपायलट तंत्रज्ञान, प्रगत उड्डाण नियंत्रक प्रणाली आणि इंधन कार्यक्षम मोटर्ससह सुसज्ज असून दिवसभर 12 तास कार्यरत राहण्यास सक्षम आहे.

सध्या 26 शहरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या या ड्रोनमध्ये 15-20 लिटरची पेलोड क्षमता, 40-45 मिनिटांचा उड्डाण कालावधी आणि भारतातील उंच इमारतींच्या निर्जंतुकीकरणासाठी आवश्‍यक असलेली पुरेशी 450 फुटांची कमाल मर्यादा उंची ही या ड्रोनची खासियत आहे. प्रत्येक ड्रोन दिवसाला 20 किलोमीटरचे अंतर व्यापू शकतो. गरुड एरोस्पेसचे 300 करोना किलर -100 ड्रोन्सचा सध्याचा ताफा दररोज 6,000 किलोमीटर अंतरापर्यंत स्वच्छता मोहीम राबवू शकेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.