पिंपरी, दि. 22 – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या थेरगाव रुग्णालयात प्रयोगशाळेसाठी स्वतंत्र विभागाची निर्मिती केली जात असून त्याचे काम देखील सुरू करण्यात आले आहे. रुग्णांची वाढती गर्दी पाहता ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
साथीचे आजार, प्रसूती आदीसह विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या थेरगाव रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी होत आहे. दिवसाकाठी 1 हजार ते 1100 रुग्ण उपचारासाठी येत असल्याची नोंद रुग्णालयाकडे होत आहे. रुग्णांवर प्राथमिक उपचार केले जात आहेत. काही रुग्णांवर योग्य उपचार करण्यासाठी रक्ताची तपासणी केली जात आहे. त्यासाठी सध्या असणारी प्रयोगशाळा अपुरी पडत आहे. तसेच रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी स्वतंत्र प्रयोगशाळेसाठी विभाग सुरू करण्यात येत आहे.
रुग्णालयात प्रवेश केल्यानंतर ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. सध्या या ठिकाणी लोखंडी पिलर उभे करण्यात आले आहे. लवकरच या तीन विभाग उभारले जाणार आहेत. या ठिकाणी असणाऱ्या प्रयोगशाळेत कर्मचाऱ्यांकडून रक्त संकलित करण्याची सुविधा आहे. संकलित केलेले हे रक्त महापालिकेच्या इतर रुग्णालयात पाठवून अहवाल प्राप्त केला जाणार आहे. त्यानुसार पुढील उपचार केले जाणार असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. हे विभाग सुरू झाल्यास रुग्णांची गैरसोय टळली जाईल. तसेच उपचार देखील वेळेत केले जातील, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.