पिंपरी, दि. 22 – पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी शहर हद्दीमध्ये राहणाऱ्या एड्स बाधित व्यक्तींना पीएमपीचा मोफत बस पास व जुन्या पासचे नूतनीकरण करून देण्यात येणार आहे. यासाठी एड्स बाधित व्यक्तींनी 30 मार्चंपर्यंत अर्ज जमा करावेत, असे आवाहन पालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. शहरातील रहिवाशी असलेल्या एड्स बाधित व्यक्तींना प्रवासासाठी पीएमपीचा बस पास मोफत देण्यात येतो. या मोफत बस पाससाठी एड्स बाधित व्यक्तींनी 30 मार्चपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी पिंपरीतील कै. नारायण मेघाजी लोखंडे कामगार भवन येथे अर्ज जमा करावा. अर्जाबरोबर आधारकार्ड झेरॉक्स प्रत, एड्स बाधित शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र किंवा कार्ड, मतदान ओळखपत्र जमा करावे, असे आवाहन समाज विकास विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.