बारामती – करोना रोखण्यासाठी सार्वजनिक शिस्त निर्माण करावीच लागणार आहे. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासोबतच करोनावर संपूर्णपणे मात करण्यासाठी नियम पाळलेच गेले पाहिजेत. करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाच्यावतीने देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी केले.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बारामती येथे उपमुख्यमंत्री पवार यांनी (दि. 20) आढावा बैठक घेतली. यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समितीचे सभापती नीता बारवकर, जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती प्रमोद काकडे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील उपस्थित होते.
पवार यांनी बारामती तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या, बरे झालेले रुग्ण, उपचार केलेले रुग्ण, विलगीकरण करण्यासंदर्भातील कार्यवाही आदींची त्यांनी माहिती घेतली. यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी उपाययोजनांची माहिती दिली.