पिंपरी (प्रतिनिधी) – सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयात शनिवारी (दि. 20) करोना संशयित 11 रुग्णांच्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर, दोन वृद्धांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.
बाधित रुग्णांमध्ये 7 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश आहे. बोपोडी, पुणे, पिंपळे गुरव, जुनी सांगवी, तळेगाव दाभाडे, नवी सांगवी, पिंपरी, येरवडा, कोंढवा आदी परिसरातील हे बाधित रुग्ण आहेत. बाधितांमध्ये 4 ज्येष्ठ नागरिक आहेत. रुग्णालयात उपचारादरम्यान दोन 75 वर्षीय वृद्धांचा मृत्यू झाला आहे. दौंड आणि महात्मा फुले पेठ (पुणे) येथील ते रहिवासी होत. टाकळीहाजी (ता. शिरूर) येथील 58 वर्षीय पुरुष आणि येरवडा येथील 61 वर्षीय महिला करोनामुक्त झाल्याने त्यांना आज घरी सोडण्यात आले.
सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयामध्ये आज 9 करोना संशयित रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले. रुग्णालयात सध्या 25 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 11 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. आत्तापर्यंत 65 जणांना उपचार करून घरी सोडले आहे.