पिंपरी (प्रतिनिधी) –‘करोना’ झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात 14 दिवस उपचार केल्यानंतर बहुतेक रुग्ण “करोनामुक्त’ होत होते. त्यानंतर आता अनेक रुग्णालयांमध्ये दहा दिवसांच्या उपचारानंतरच रुग्णांना डिस्चार्ज देण्यात येत आहे. परंतु एका ज्येष्ठ नागरिक महिलेला तब्बल एक महिना “करोना’सोबत झुंज द्यावी लागली. परंतु अखेर त्या 61 वर्षीय रुग्ण महिलेने “करोना’वर मात केली. सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयात येरवडा येथील ज्येष्ठ महिलेला करोनावरील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
महिलेला मधुमेह असल्याने तसेच निमोनियामुळे प्रकृती ठीक नसल्याने “करोना’ पाठ सोडण्यास तयार नव्हता. डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी तसेच रुग्ण महिलेने हार न मानता “करोना’सोबत झुंज सुरुच ठेवली आणि “करोना’च्या विषाणूंवर मात केली. करोना चाचणीचा सलग दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर आज त्यांना घरी सोडण्यात आले.
डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश
रुग्ण महिलेला निमोनिया झाला होता. तसेच, मधुमेह हा आजार देखील आहे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यापासून तिच्यावर सलग 25 दिवस रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यानंतर करोना वॉर्डमध्ये हलविण्यात आले. संबंधित वॉर्डमध्ये आठवडाभर उपचार सुरू होते. त्या पूर्णत: अंथरुणाला खिळलेल्या होत्या आणि केवळ द्रव पदार्थाचे सेवन करीत होत्या. त्यांना तब्बल 29 दिवस जादा प्रमाणात प्राणवायूचा पुरवठा करावा लागला. डॉक्टर, परिचारिका व अन्य कर्मचाऱ्यांनी प्रयत्न कमी पडू दिले नाहीत आणि रुग्ण महिलेस “करोना’पासून मुक्त केले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली फिजिशियन डॉ. किरण खलाटे व सहकारी डॉक्टरांनी रुग्ण महिलेवर उपचार केले.