लोणावळा, (वार्ताहर) – लोणावळा शहरात अवैध हुक्का पार्लर चालवणाऱ्या हॉटेल युटोपिया हाय व हॉटेल कुमार रिसॉर्ट याठिकाणी तर लोणावळा ग्रामीण हद्दीतील हॉटेल बैठक ढाबा येथे धडक कारवाई करीत पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच हुक्क्यासाठी लागणारा सुमारे ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
लोणावळा उपविभागाचे सहापोलीस अधीक्षक आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी ही कारवाई केली आहे. लोणावळा शहर पोलीस स्टेशन हद्दीतील हॉटेल युटोपिया डाईन हाय व कुमार रिसॉर्ट तसेच लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील हॉटेल बैठक ढाबा या हॉटेल्समध्ये अवैधपणे हुक्का पार्लर चालत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती.
त्याआधारे शनिवारी (दि. १६) रात्री सत्यसाई कार्तिक यांनी त्यांच्या पथकासह तेथे छापा टाकला. तिन्ही हॉटेलमधून हुक्का पॉट, तंबाखुयुक्त फ्लेवर्स, फिल्टर, पाइप आदी ९३ हजार ५३० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा शहर पोलीस स्टेशन येथे रुस्तम वकील अहमद (वय२२, रा. लोणावळा), रोशन मनोज यादव (वय ३०, रा. छत्रपती शिवाजी महाराज चौक, तुंगार्ली, लोणावळा), कृष्णा नाथा राठोड (वय ३१, रा. कालेकर मळा, लोणावळा), प्रताप कृष्णा डिंमळे (वय ४२, रा. कार्ला, ता. मावळ) व बिपीन्छु मार परमेश्वर महतो (वय ३०, रा. भारती अपार्टमेंट फ्लॅट नं. २०२ साईबाबा मंदिराजवळ शांतीनगर, उल्हासनगर, ठाणे) यांच्या विरोधात दोन स्वतंत्र गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहापोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, शुभम चव्हाण, रोहन पाटील, अंकुश नायकुडे, सचिन गायकवाड, सुभाष शिंदे, अंकुश पवार, गणेश येलवंडे आदींनी केली.