मुंबई – मुंबईतील वांद्रे भागातील ठाकरे गटाच्या शाखेवर बुलडोझर फिरवण्यात आला आहे. ही शाखा अनधिकृत असल्याचा दावा करत मुंबई महापालिकेने ही कारवाई केली आहे. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर ही शाखा आहे. तब्बल 40 वर्षांपासून ही शाखा तेथे अस्तित्वात होती. त्यामुळे या कारवाईवरून राजकारण तापले आहे.
मुंबई महापालिकेच्या या कारवाईमुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. घटनास्थळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते व त्याठिकाणी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मुंबई महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी असून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉलनुसार शाखेतील उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, मीनाताई ठाकरे यांचे प्रथम फोटो हटवले. त्यानंतर बुलडोझरने पाडकाम करण्यात आले.
ठाकरे गटाचे वॉर्ड क्रमांक 96 जे माजी नगरसेवक हाजी हलीम खान यांचे हे कार्यालय आहे. फारूख शेख हे या शाखेचे शाखा प्रमुख आहेत. या कारवाईवरून खान यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर गंभीर आरोप केलेत. खान यांनी म्हटले, शिंदे गटात येण्यासाठी मला 10 कोटींची ऑफर देण्यात आली होती. ही ऑफर नाकारल्यामुळेच माझे कार्यालय असलेल्या या शाखेवर ही कारवाई करण्यात आली आहे. शिंदे गटाने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.
40 वर्षांपूर्वीची इमारत अनधिकृत कशी?
ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी या कारवाईवरुन शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. खासदार सावंत म्हणाले, ज्या शाखेवर महापालिका कारवाई करत आहे, ती शाखा 40 वर्षे जुनी आहे. 1995 च्या झोपड्यादेखील पालिका प्रशासनाने अधिकृत केल्या आहेत. मग 40 वर्षे जुनी शाखा अनधिकृत आहे, असे महापालिका कसे म्हणू शकते? गद्दार आणि मिंधे लोक सूड भावनेने ठाकरे गटाविरोधात कारवाई करत आहेत. हे योग्य नाहीस, असेही त्यांनी म्हटले आहे.