बुलडाणा : नांदेड येथील एका कोविड सेंटरने मृत रुग्णाला तीन दिवस उपचार करून बिल वसूल केल्याची घटना ताजी असताना आता बुलडाण्यातील खामगाव येथील एका खाजगी कोविड सेंटरच्या प्रशासनाने बिलातील 11 हजार रुपयांकरता चक्क रुग्णाच्या पत्नीचं मंगळसूत्र ठेऊन घेतल्याची संतापजनक बाब समोर आली आहे. या सर्व प्रकाराचा व्हिडीओ देखील समाजमाध्यमात व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आवार गावातील मंगेश गवई नावाच्या तरुणाला सर्दी, तापचा त्रास जाणवत होता. त्याने कोविड अँटिजेन टेस्ट केली मात्र त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. मात्र लक्षणे जाणवत असल्याने त्याने छातीचा एमआरआय केला. तो रिपोर्ट खामगाव येथील खासगी कोविड सेंटरमध्ये दाखवला असता डॉक्टरांनी त्यांना भरती होण्यास सांगितले.
शेतमजूर परिवारातील व अत्यंत गरीब परिस्थिती असतानाही व कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असताही जुळवाजुळव करून या रुग्णाने नऊ दिवस या खासगी कोविड सेंटरमध्ये उपचार घेतले. या नऊ दिवसाचे बिल रुग्णालय प्रशासनाने 81 हजार रुपये काढले.
रुग्णाने 70 हजार रुपये जमा केल्यावर 11 हजार रुपये आम्ही घरी गेल्यावर पुन्हा आणून देतो असे सांगितले. मात्र पूर्ण पैसे आताच द्या नाहीतर रुग्णाला सुटी मिळणार नाही, रुग्णाच्या पत्नीचं मंगळसूत्र ठेऊन द्या आणि पैसे आणून द्या, असं रुग्णालय प्रशासनानं सांगितलं.
नातेवाईकांनी मंगळसूत्र दिल्यावर रुग्णालय प्रशासनाने रुग्णाला सुट्टी दिली. हा सर्व प्रकार एका व्हिडिओद्वारे समाज माध्यमातून वायरल झाल्यावर रुग्णालय प्रशासन जागे झाले. तडकाफडकी रुग्णाच्या नातेवाईकांना बोलावून समजूत काढण्याचाही प्रयत्न केला पण तो पर्यंत उशीर झाला होता. समाज माध्यमातून यावर संतापजनक प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.