आंबेठाण – खेड तालुक्यात करोनाबाधित, उपचार घेणारे अन् घरातच विलगीकरण केलेल्या करोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. तालुक्यातील पहिले कोविड सेंटर उभारलेल्या महाळुंगे इंगळे गावात दिवस-रात्र रुग्णवाहिका धावत जाते. हा सायरनचा आवाज आता महाळुंगेकरांच्या सवयीचा भाग झाला असला तरी काळजात धस्स होते. मात्र, अत्यवस्थ रुग्णासाठीच सायरनचा लावणे योग्य आहे. मात्र, प्रत्येक रुग्णासाठीच सायरन लावला जात असल्याने “रुग्णवाहिका चालकांना कोणीतरी आवरा’ असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
महाळुंगे इंगळे येथे जिल्हा परिषदेच्या वतीने म्हाडा इमारतीमध्ये कोविड सेंटरची उभारणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे येथे दिवसभरात अनेक करोनाबाधित रुग्णांची ने-आण मोठ्या प्रमाणात होत आहे. हे कोविड सेंटरला जाण्यासाठी स्थानिक रहिवासी रस्त्याने रुग्णवाहिकेला जावे लागते. त्यावेळी जा-ये करताना जोरजोरात सायरन वाजवत रुग्णवाहिका सुसाट जाते. रस्त्यावर गर्दी असो किंवा नसो तसेच रात्री बारा वाजता रस्त्यावर सामसूम असते त्यावेळी देखील यांचा सुसाट वेग व सायरन सुरूच असतो.
या आवाजामुळे स्थानिक नागरिक भयभीत तसेच त्रस्त झाले आहे. रस्त्याला गर्दी असेल किंवा अगदी अत्यवस्थ रुग्णाला घेऊन जाण्यासाठी असेल तर सायरन नक्की वाजवा; परंतु करोना चाचणीला घेऊन जाण्यासाठी देखील जोरात सायरन वाजवला जात असल्याने नागरिकांना अक्षरश: नको नको झाले आहे. त्यामुळे या रुग्णवाहिका चालकांच्या मनमानीला चाप लावावा अशी मागणी जोर धरीत आहे.
विनाकारण सायरन वाजवून आणि वेग वाढवून भीतीदायक परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांना सर्वाधिक त्रास होत आहे. तरी संबंधितांनी यावर वेळीच हस्तक्षेप करावा, अशी मागणी महाळुंगे इंगळे येथील नागरिकांनी केली आहे.
चालकांवर अंकुश आणणे गरजेचे
वास्तविक पाहिले तर ज्यांची करोना चाचणी करायची आहे त्यांना दोन-दोन दिवस वाट पाहावी लागते. अहवाल येण्यासाठी देखील दोन ते तीन दिवस लागतात मग एवढी घाई का? तर व्हेंटिलेटर व अत्यावश्यक सुविधा असलेल्या रुग्णवाहिकांसाठी सायरन वाजवणे ठीक आहे पण साध्या रुग्णवाहिकांचे चालक सायरन वाजवत सुसाट वेगाने रुग्णवाहिका दामटत असल्याने त्यांच्यावर अंकुश आणणे गरजेचे झाले आहे.
ज्या रुग्णांना कोणताही त्रास होत नाही अशा रुग्णांना घेऊन जाताना व येताना सायरन वाजवण्याची गरज नाही. याबाबत रुग्णवाहिका चालकांना योग्य ती समज दिली जाईल.
– डॉ. बळीराम गाढवे, तालुका वैद्यकीय अधिकारी, खेड तालुका