कोपर्डे हवेली (वार्ताहर) – शिरवडे गावात आणखी पाच करोनाबाधित रूग्ण सापडले आहेत. हे सर्वजण वेगवेगळ्या साखळीतील असल्याने ग्रामस्थ चांगलेच धास्तावले आहेत. गावात अजून किती बाधित आहेत याचा शोध सुरू आहे. यापूर्वीही शिरवडे स्टेशन येथे दोन व शिरवडे गावात दोन रुग्ण आढळले होते. परंतु ते सध्या करोनामुक्त झाले आहेत. सध्याच्या पाच रूग्णांपैकी दोन दवाखान्यात तर तिघेजण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
राष्ट्रीय महामार्ग ते कराड मसूर रस्त्यालगत असणारे शिरवडे गाव राजकीय, सामाजिक उपक्रमात अग्रेसर आहे. करोना प्रतिबंधात्मक उपाय व प्रबोधनामुळे अनेक दिवस करोनापासून दूर राहिले. परंतु, गावात गेल्या दोन दिवसात पाच करोनाबाधित रुग्ण आढळून आले. आरोग्य यंत्रणा व पोलीस प्रशासनाने लगेच प्रतिबंधक औषध फवारणी, बाधितांच्या संपर्कातील यादी घेऊन प्रबोधन केले. तसेच लक्षणे असणाऱ्यांवर तात्काळ उपचार करण्यात येत आहेत.
करोना हा बरा होणारा आजार आहे. इतर रोगांच्या मानाने अत्यल्प तीव्रतेचा आहे. परंतु, समाजामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्येष्ठ नागरिक व लहान मुले यांची काळजी घेण्याबरोबरच या आजाराबद्दल अजूनही पूर्ण माहिती नसलेल्या अज्ञानी लोकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे, असे मत माजी उपसभापती सुहास बोराटे यांनी व्यक्त केले. यावेळी मसूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्यसेवक विवेक देशपांडे, ग्रामविकास अधिकारी दिपक चव्हाण, तलाठी सुजित थोरात, सचिन पाटील, आशासेविका तसेच पोलिस हेडकॉन्स्टेबल खाडे उपस्थित होते.
अन्यथा कडक कारवाई…
तळबीड पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक जयश्री पाटील यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी व पोलीस पाटील ताजुद्दीन संदे यांच्या समवेत जाऊन ग्रामस्थांना सूचना दिल्या. करोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता सर्वांनी न घाबरता स्वतःची काळजी घ्यावी. विना मास्क घराबाहेर पडू नये, किराणा दुकाने, भाजी मंडई, शिवाजी चौक व सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, तसेच वेळोवेळी आपले हात स्वच्छ साबणाने धुवावे आणि पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. कोणी नियमांचे उल्लंघन करताना आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल अशा सक्त सूचना त्यांनी दिल्या.