पुणे, दि. 4 -अधिक गतीने कोर्ट ट्रायल कशा, चालतील यावर काम करणे आवश्यक आहे. समन्स, वॉरंट बजावणे यांसारख्या प्रक्रिया लवकर होत नाहीत. याचा विचार करून पायाभूत उपाययोजना केल्या पाहिजेत. यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेणे काळाची गरज आहे. न्यायाधीश व वकीलांनी एकत्र येऊन या दिशेने पावले उचलणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गोविंदराव सानप यांनी केले.
पुणे बार असोसिएशनतर्फे वकिलांसाठी जिल्हा न्यायलयात “ज्युडीशियल कोलोकिया’ या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्या अंतर्गत न्यायमूर्ती सानप यांच्या “ट्रायल कोर्ट प्रक्रियेतील अडचणी आणि आव्हाने व त्यावरील उपाय’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्यावेळी प्रमुख पुणे जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. पांडुरंग थोरवे, भारतीय वकील परिषदेचे सदस्य ऍड. जयंत जायभावे, महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मिलिंद थोबडे व उपाध्यक्ष विवेकानंद घाडगे, महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेचे सदस्य ऍड. गजानन चव्हाण, ऍड. वसंतराव साळुंखे, ऍड. हर्षद निंबाळकर, ऍड. अहमदखान पठाण, ऍड. राजेंद्र उमाप, ऍड. संग्राम देसाई, ऍड. आशिष देशमुख हे उपस्थित होते. उपस्थित वकील परिषदेच्या सदस्यांचा सन्मान असोसिएशनतर्फे करण्यात आला. तसेच पुणे पिपल्स बॅंकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ऍड. सुभाष मोहिते यांचाही सन्मान करण्यात आला.
सानप म्हणाले की, नवोदित वकीलांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. त्यांच्या कल्पनांना वाव दिला पाहिजे. तर ऍड. थोरवे म्हणाले, “”या व्याख्यानाच्या माध्यमातून वकिलांना न्यायाधीशांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा उपयोग व्हावा. दैनंदिन कामकाजात अनुभावाचा भर पडावा, या या हेतूने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.”
यावेळी उपाध्यक्ष ऍड. विवेक भरगुडे, ऍड. लक्ष्मण येळे पाटील, सचिव ऍड. अमोल शितोळे, ऍड. सुरेखा भोसले, हिशोब तपासणीस ऍड. शिल्पा कदम, कार्यकारिणी सदस्य ऍड. सई देशमुख, ऍड. अर्चिता जोशी, ऍड. अमोल भोरडे, ऍड. अजय नवले, ऍड. अमोल दुरकर, ऍड. तेजस दंडगव्हाळ, ऍड. कुणाल अहिर, ऍड. रितेश पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन खजिनदार ऍड. प्रथमेश भोईटे यांनी केले. आभार कार्यकारिणी सदस्य ऍड. काजल कवडे यांनी मानले.