पुणे – तीघांच्या टोळक्याने जोडप्यास घेरुन महिलेला जबर मारहाण करत लूटल्याची घटना पाषाण येथील सुसखिंडीत घडली. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौरव बाळासाहेब तेलंग (34, रा.केशवनगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार गौरव एका संस्थेत ऍनलायझेशनचे काम करतात. ते काम संपल्यावर त्यांच्या सहाकारी मैत्रिणीला घेऊन पाषाण येथील सुस खिंडीत गेले होते.
तेथील गार्डनमध्ये फिरल्यावर ते टेकडीवर गेले. तेथे बसले असताना हातात काठ्या घेऊन तीन व्यक्ती आल्या. त्यातील एकाने त्यांच्या मैत्रीणीला जोरात कानाखाली लावली.
यानंतर तीला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन फिर्यादी गौरव व तीच्याकडील 90 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, 14 हजार रुपयांचे दोन माबाईल, एक चांदीची अंगठी आणि रोकड असा 1 लाख 7 हजार रुपयांचा ऐवज लूटून नेला.