परिंचे -परिंचे (ता. पुरंदर) ग्रामपंचायतीमध्ये झालेला भ्रष्टाचार व श्री भैरवनाथ दूध उत्पादन संस्थेने गायरान जागेत केलेल्या अनधिकृत बांधकामाविरोधात ग्रामपंचायत सदस्य अनिल जाधव व सेवानिवृत्त शिक्षक निवृत्ती शेडगे यांनी उपोषण सुरू केले आहे.
ग्रामपंचायत व्यवहारात आर्थिक अनियमितता आढळून आली आहे. भ्रष्टाचारामध्ये अस्तित्वात नसलेल्या दुकानांची खोटी बिले, ग्रामसभेचे खोटे ठराव सादर करणे, परिंचे गावठाण पिण्याच्या पाण्याच्या विहिरीचे कामाचे बिल काम चालू होण्यापूर्वी दीड वर्षे आधी काढले व खोटे ठराव करून मंजूर केले असल्याची पुराव्यानिशी सिद्ध झाल्या आहेत, तरीसुद्धा दोषींवर अद्याप कारवाई झाली नसून शासकीय अधिकारी भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहेत.
चौकशी दरम्यान अहवाल बदलले आहे. तरी भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई न झाल्याने उपोषण सुरू केले असल्याचे अनिल जाधव यांनी सांगितले. भैरवनाथ दूध उत्पादक संस्थेने केलेल्या अनधिकृत बांधकामाविरोधात गेल्या 12 वर्षांपासून लढा देत असून 2012 मध्ये गावातील दहा ग्रामस्थांनी उपोषण केले होते. आजही तो लढा सुरू असून न्याय मिळेपर्यंत लढणार असल्याचे नामदेव शेडगे यांनी नमूद केले.
श्री भैरवनाथ दूध उत्पादक संस्थेचे प्रकरण न्यायप्रविष्ट असून यांची सुनावणी महसूल मंत्री कार्यालयात सुरू आहे. महसूल मंत्रालयाचे आदेश आल्यावर योग्य ती कारवाई होणार आहे.