उद्धव ठाकरे : इतर बाबींवरही लक्ष केंद्रीत करावे
मुंबई – करोनाची एक लाट ओसरल्यानंतर दुसरी लाट येते, हा जगभरातील अनुभव आहे. त्यावरून गाफील राहून चालणार नाही. त्यासाठीच प्रशासनामार्फत मोठ्या प्रमाणावर सुविधांची उभारणी करण्यात येत आहे. लॉकडाऊननंतर आपण काही गोष्टींमध्ये शिथिलता दिली आहे. दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतु हे करत असताना आपल्याला कायम सतर्क राहावे लागणार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
ठाणे जिल्ह्यातील करोना आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने त्यांनी आज आढावा बैठक घेतली. या बैठकीस पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काटेकोर नियमांचे नागरिकांनी पालन करावे. कायम सतर्क राहावे. तसेच करोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. आपल्या सर्वांना मास्कचा नियमित वापर करावाच लागणार आहे.
पावसाळी आजारांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. ठाणे, मुंबईला लागून आहे. गेले काही महिने सातत्याने करोनावर लक्ष दिले गेले परंतू आता आपल्याला इतर बाबींवर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे असेही त्यांनी सांगितले. याशिवाय आगामी काळात विविध धर्मियांचे सण असल्याने पुढचा टप्पा महत्त्वाचा आहे. सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असेही त्यांनी सागितले.