धरणक्षेत्रांत पावसाचा जोर ओसरला
पुणे – धरणसाखळीतील सर्वांत मोठे असलेले वरसगाव धरण सोमवारी 100 टक्के भरले. धरण भरल्याने पॉवर हाऊसमधून 550 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. वरसगाव धरणात 12.78 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. दरम्यान खडकवासला, पानशेत या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने या दोन्ही धरणांतील विसर्ग कमी करण्यात आला आहे. आता टेमघर धरण 85.05 टक्के इतके भरले आहे.
सोमवारी खडकवासला-2, पानशेत-8, वरसगाव-10 आणि टेमघर धरणक्षेत्रात 15 मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. खडकवासलाच्या कालव्याद्वारे 1 हजार क्युसेक तर धरणातून 2,568 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. पानशेत धरण पॉवर हाऊसमधून 600, तर धरणातून 1,890 क्युसेकने विसर्ग सुरू आहे.