647 कोटींच्या रस्ते सफाईत ‘गोलमाल’?

रिंग झाल्याचा आरोप : सहा कामांसाठी सहा कंत्राटदारांचा आलटून पालटून सहभाग

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील रस्ते यांत्रिकी पध्दतीने साफसफाई कामाच्या विभागलेल्या निविदेत सहा कामांसाठी सहा कंत्राटदारांनीच आलटून पालटून सहभाग घेतल्याचे छाननीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे 647 कोटी रुपयांच्या या कंत्राटात रिंग झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामध्ये सत्ताधारी भाजप आणि विरोधातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची भागीदारी असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.

महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या रस्त्यांची तसेच मुंबई – पुणे महामार्गाच्या दुतर्फा रस्त्यांची यांत्रिकी पध्दतीने दैनंदिन साफसफाई करण्यात येणार आहे. त्यासाठी मेसर्स टंडन अर्बन सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड यांची 24 ऑगस्ट 2018 रोजी सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. आजमितीला 863 किलोमीटर रस्त्यांची यांत्रिकी पध्दतीने साफसफाई सुरु आहे. मात्र, नव्या निविदेत 1 हजार 670 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची साफसफाई करण्याचे नियोजन करण्यात आले. या कामासाठी एक संयुक्त निविदा न काढता सहा विविध पॅकेजेसमध्ये विभागणी करत 8 वर्ष कालावधीसाठी निविदा काढण्याची शिफारस सल्लागाराने केली.

नऊ मीटर आणि त्यापेक्षा जास्त रुंदीच्या रस्त्यांची यांत्रिकी पध्दतीने साफसफाई करण्यात येईल. जास्त वर्दळीच्या भागांमध्ये दिवसांतून दोनदा तर इतर भागांमध्ये दररोज साफसफाई केली जाईल. पुढील 8 वर्षांसाठी 602 कोटी 12 लाख एवढा खर्च येईल असे सल्लागाराने सांगितले. परंतु, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सल्लागाराच्या शिफारशींमध्ये फेरबदल केले. सुधारित निविदेची रक्कम 646 कोटी 53 लाख एवढी करत वाहनांची संख्या 51 आणि कामगारांची संख्या 706 निश्‍चित केली. तसेच निविदेचा कालावधी 7 वर्षे करण्यात आला. विधानसभा निवडणुकीपूर्वी निविदा प्रसिध्द करण्यात आली होती. तसेच दोन – तीन महिने मुदतवाढही देण्यात आली होती.

नुकतीच ही निविदा उघडण्यात आली असून तांत्रिक छाननीमध्ये मोजक्‍याच कंत्राटदारांनी भाग घेतल्याचे स्पष्ट झाले. “अ’ आणि “फ’ क्षेत्रीय कार्यालयांसाठी 6 जणांनी, “ब’ आणि “ड’ क्षेत्रीय कार्यालयांसाठी 5 जणांनी, “क’ आणि “ई’ क्षेत्रीय कार्यालयांसाठी 5 जणांनी “ग’ आणि “ह’ क्षेत्रीय कार्यालयांसाठी 6 जणांनी तर पुणे – मुंबई रस्त्यांसाठी 5 जणांनी निविदा भरल्याचे उघड झाले.आंतरराष्ट्रीय कंत्राट प्रसिध्द करुनही निवडक सहा कंत्राटदारांनीच निविदा प्रक्रियेत भाग घेतला. कोणतीही स्पर्धा न होता संगनमत झाल्याचे यातून स्पष्ट होते. यामध्ये सत्ताधारी भाजप पदाधिकारी आणि विरोधातील राष्ट्रवादीचे पिंपरीतील लोकप्रतिनीधी सहभागी असल्याची जोरदार चर्चा आहे.

कामगारांवर येणार उपासमारीची वेळ
पिंपरी चिंचवड शहरातील हमरस्त्यांच्या साफसफाईसाठी आठ प्रभागांमधून यांत्रिक पद्धतीने स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यामुळे ठेकेदार पद्धतीने काम करणाऱ्या निम्या कर्मचाऱ्यांचा रोजगार बुडणार आहे. सद्यस्थितीत शहरात रस्ते साफसफाई करण्यासाठी 1 हजार 579 कर्मचारी आहेत. यांत्रिक पद्धतीने रस्ते साफ करतेवेळी अवघ्या 866 कर्मचाऱ्यांची गरज असणार आहे. त्यामुळे उर्वरित कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे.

ठराविक ठेकेदारांनी आलटून पालटून निविदा भरल्या आहेत. या कामासाठी संयुक्त निविदा न काढता सहा पॅकेजमध्ये विभागणी केली आहे. सात वर्षांसाठी सल्लागाराने निविदा काढण्याची शिफारस का केली हा प्रश्‍न आहे. या निविदेमुळे अनेक कर्मचारी बेरोजगार होणार आहे. त्यांच्या भव्यिष्याचा प्रश्‍न आहे. स्पर्धा न झाल्यामुळे अधिकचा खर्च होण्याची दाट शक्‍यता आहे. त्यामुळे या निविदा रद्द कराव्यात.
– नाना काटे, विरोधी पक्षनेता.


या सर्व कामांचे एकत्रीकरण करण्याची काय आवश्‍यकता होती? सलग सात वर्ष एकच ठेकेदार काम करणार आहे. भविष्यात कामगारांनी बंद केल्यास शहर कचऱ्यात जाईल. यांत्रिकीकरणामध्ये एक गाडी 50 लाख रुपये धरली तर, 57 गाड्यांचे 25 ते 30 कोटी रुपये होतात. महापालिकेने स्वत: गाड्या खरेदी कराव्यात. कामगार स्वयंरोजगार संस्थाकडून काम करुन घ्यावे.

– श्रीरंग बारणे, खासदार

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.