CoronaVaccine : लस घेतल्यानंतर धोका कमी होतो, पण…

नवी दिल्ली – भारतात आतापर्यंत 12 कोटी लोकांना करोनाविरोधी लस देण्यात आली आहे. आता या मोहीमेला गती देत 18 वर्षे वयाच्या पुढील सगळ्यांनाच लस देण्याचा निर्णय घेण्यात आला असून येत्या 1 मे पासून त्याची अमलबजावणी होणार आहे. मात्र लसीबाबत अजुनही बऱ्याच चौकशा आणि शंका उपस्थित केल्या जात आहेत.

त्यातील सगळ्यांत महत्वाचे म्हणजे दोन डोस घेतल्यानंतर माणूस करोनापासून सुरक्षीत होतो का?
कोणती लस उपयुक्त आणि चांगली आहे. आजार एकच आहे, तर वेगवेगळ्या लसी कशा
आणि मुळात लस घेणे सुरक्षीत आहे का, हे ते प्रश्‍न आहेत. त्यांना तज्ञांकडून उत्तरे दिली जात असून सगळ्याच लसी सुरक्षीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुळात प्रत्येक लस ही पूर्ण चाचण्या करूनच आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या विचार करूनच बाजारात आणल्या जातात. या संदर्भात प्रोटोकॉल असतो, नियम असतो त्यांचे पालन केले जाते. त्यानंतरच त्यांना परवानगी दिली जाते. तसेच करोनावर विजय प्राप्त करण्यासाठी वेगवेगळे देश प्रयत्न करत आहेत.

अर्थात त्यांच्या सरकारांचा लस निर्मितीच्या प्रक्रियेत सहभाग नसतो तर तेथील कंपन्या आणि शास्त्रज्ञ ती तयार करत असतात. सरकारचे काम त्यांना मदत करण्याचे असते. प्रत्येक देशाची पध्दत वेगळी असते. आजार जरी एकच असला तरी वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळी औषधे तयार करत असतात आणि त्यांची चाचणी घेउन मान्यता दिली जात असते. त्यामुळे सगळ्याच लसी उपयुक्त असतात.

तसेच एखाद्या देशाने दुसऱ्या देशात तयार केलेली लस जरी वापरायचे ठरवले तरी अगोदर त्याची चाचणी घेतली जात असते. त्यानंतरच तिला परवानगी दिली जाते. करोना लस घेतल्यावर करोना होणारच नाही असे नाही. मात्र लसीमुळे मोठे संरक्षण प्राप्त होते. दोन डोस घेतल्यावरही संसर्ग होउ शकतो. त्यामुळे लस घेतली म्हणजे झाले असे न मानता योग्य ती काळजी आणि खबरदारी घेत राहणे आवश्‍यक असते. लस तुम्हाला गंभीर परिणामांपासून वाचवू शकतो. त्यामुळे पुढची क्‍लिष्टता आणि धोके बऱ्याच प्रमाणात कमी होतात. त्यामुळे लस कोणती, तिचा काय फायदा असा नकारात्मक विचार न करता ती घेतली पाहिजे असे तज्ञांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.