नवी दिल्ली : करोना संसर्गाचे थैमान अजूनही जगात सर्वत्र सुरूच आहे. करोनाबाधितांची संख्या आटोक्यात आल्यानंतर पुन्हा एकदा संसर्ग जोर पकडत असल्याचे चित्र आहे. करोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमुळेही अनेक देशांची चिंता वाढवली आहे.
मलेशियामध्ये महिनाभरापासून असलेला पूर्ण लॉकडाऊन अनिश्चित काळासाठी पुढे लागू राहणार आहे. तर, बांगलादेशमध्ये एक जुलैपासून लॉकडाऊन निर्बंध लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
करोनाग्रस्तांची दैनंदिन रुग्णवाढ चार हजारांखाली येत नाही, लसीकरणाचा वेग दहा टक्क्यांपर्यंत पोहोचत नाही आणि अतिदक्षता विभागामध्ये दाखल होणाऱ्य़ा रुग्णांची संख्या कमी होत नाही, तोपर्यंत लॉकडाऊन उठवला जाणार नसल्याचे पंतप्रधान मुहिद्दीन यासिन यांनी म्हटले.
मलेशियामध्ये ही स्थिती जुलैच्या मध्यात येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती. मलेशियामध्ये लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनची मुदत सोमवारी संपणार होती. मात्र रुग्णसंख्या घटत नसल्याने मलेशियामध्ये रविवारी 5586 नव्या करोनाग्रस्तांची नोंद झाली. आतापर्यंत पाच हजार जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे.
मलेशियातील केवळ सहा टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. एक जूनपासून मलेशियामध्ये जवळपास पूर्ण लॉकडाऊन लावण्यात आला आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने बांगलादेश सरकारने एक जुलैपासून देशव्यापी लॉकडाऊन लादण्याचा निर्णय घेतला आहे.
अतिरिक्त सचिव एस. के. रफीकुल इस्लाम यांनी दिलेल्या एका मुलाखतीत याची माहिती दिली. तथापि, सोमवारपासून देशात रुग्णसंख्या अधिक असलेल्या भागात मर्यादित प्रमाणात ‘बंद’ राहणार आहे. गृहमंत्री असदुझमान खान यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर अनेक ठिकाणी मजुरांचे स्थलांतर सुरू झाले आहे. हजारोंच्या संख्येने मजूर आपल्या गावी, इतरत्र ठिकाणी जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मोठ्या प्रमाणावर प्रवाशी वाढल्याने जलवाहतूक, परिवहन सेवेवर ताण निर्माण झाला आहे.