न्यूयॉर्क : अमेरिकेत कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत चालला आहे. अमेरिकेत दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. २४ तासांमध्ये अमेरिकेत २ हजार ५०२ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्याचसोबत अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा ६० हजार ८५३ वर पोहचला आहे.
चीनच्या वुहान प्रांतातून परसरलेल्या कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. अमेरिकेत कोरोनाने सर्वांत जास्त नागरिकांचा बळी घेतला आहे. अमेरिकेत आतापर्यंत १० लाखांपेक्षा अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १ लाख ४७ हजार रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान, अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरामध्ये कोरोनाची लागण झालेले ३ लाखांपेक्षा जास्त नागरिक आहेत. तर २३ हजार रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. न्यूजर्सीमध्ये १ लाखांपेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर ६ हजार रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. यानंतर मॅसाचुसेट्स शहरामध्ये ६० हजार, इलिनोझसमध्ये ५० हजार आणि कॅलिफोर्नियामध्ये ४८ हजार कोरोनाबाधित रुग्ण आहेत.