राजगुरूनगर -चाकण येथील एकाच कंपनीत सातजणांसह नाणेकरवाडी, चाकणमधील प्रत्येकी एकजण करोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडले असल्याने औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण आहे. कंपनीतील एकजण कडूस येथील आहे. तालुक्यातील बाधित रुग्णाची संख्या 43 वर गेली असल्याची माहिती सभापती अंकुश राक्षे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.
चाकण येथील औद्योगिक वसाहतीमधील पोकलॅंड बनवणाऱ्या नामांकित कंपनीत काम करणाऱ्या सात कामगारांना करोनाची लागण झाली आहे. यामुळे संपूर्ण एमआयडीसी हादरली आहे. गेली काही दिवसांपासून चाकण एमआयडीसीतील कंपन्या सुरू झाल्या आहेत.
आतापर्यंत चाकणमध्ये 9 कामगारांना करोनाची लागण झाली आहे. या कंपनीतील कामगार कंपनीत राहून काम करीत होते; मात्र प्रत्यक्षात त्यांनी पुणे, पिंपरीत ये-जा केली होती. त्यामुळे लागण झाल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
कंपनीतील सातपैकी एक कामगार कडूस येथील असल्याने त्याची नोंद खेड तालुक्यात केली असून उर्वरित सहा पॉझिटिव्ह कामगारांची नोंदणी पिंपरी चिंचवड येथे केली आहे.
कडूसमध्ये उपाययोजना
कडूस येथे एक व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याने खबरदारीची उपायोजना सुरु करण्यात आली आहे. गटविकास अधिकारी अजय जोशी, पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, यांनी प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांची बैठक घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. यापूर्वी कडूस गावात चार करोना पॉझिटिव्ह व्यक्ती उपचार घेऊन बऱ्या होऊन घरी आल्या आहेत, असे असताना कामगार पॉझिटिव्ह आल्याने पुन्हा कडूस गावात कंटेनमेंट झोन लागू होणार आहे.