निजामाबाद – जगभरात करोना संसर्गाने थैमान घातलं आहे. करोनाने देशात लाखो लोकांचे बळी घेतले आहे. कुटुंबच्या कुटुंब करोना संसर्गाने उद्धवस्त झाले. तर लॉकडाऊनमुळे अनेकांच्या हातचा व्यावसाय गेला असून हजारो लोक बेरोजगार झाले आहेत. तर कुटुंबप्रमुखांचे निधन झालेल्या कुटुंबाची अवस्था बिकट झाली आहे. अशीच अवस्था निजामाबाद येथील एका कुटुंबाची झाली. मात्र या कुटुंबातील दहा वर्षांच्या चिमुरडीने घराची जबाबदारी आपल्या घेत पौराहित्य सुरू केलं आहे.
तेलंगनामधील निजामाबाद जिल्ह्यातील बोगाराम गावात राहणाऱ्या श्रीविद्या या चिमुरडीवर घराची जबाबदारी स्वत:वर घेण्याची वेळ आली आहे. वास्तविक पाहता, श्रीविद्याचं वय हसण्या-खेळण्याचं आणि बागडण्याचं आहे. करोनाने तिच्या डोक्यावर वडिलांचं छत्र हिरावून घेतलं.
श्रीविद्याचे वडील, संतोष गावातील हनुमान मंदिराचे पुजारी होती. काही दिवसांपूर्वीच त्यांचं करोना संसर्गाने निधन झालं. श्रीविद्याने आधीच आपल्या वडिलांकडून मंत्रपठण, पूजा अर्चा याचं शिक्षण घेतलं होतं. त्याच्या बळावर तिने आता पौराहित्य करण्यास सुरुवात केली आहे. श्रीविद्याला दोन मोठी भावंड आहेत.
इयत्ता सातवीत शिकणारी श्रीविद्या आता गावातील लोकांकडे पूजाअर्चा, व्रत वैकल्ये, लग्न किंवा अन्य धार्मिक विधीचे पौरोहित्य करते. एवढेच नव्हे तर आजूबाजूच्या गावातही असे धार्मिक कार्यक्रम असल्यास तिथं जाऊनही पौरोहित्य करते. एवढ्या लहान वयात अशा व्यवसायाची जबाबदारी घेतल्यामुळे श्रीविद्याचं पंचक्रोशीत कौतुक होत आहे.