चंदीगड – पंजाबात सन 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी अकालीदल आणि बहुजन समाज पार्टी यांच्यात युती करण्याचा निर्णय झाला आहे.
अकालीदलाचे अध्यक्ष सुखबीरसिंह बादल यांनी आज पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. ते म्हणाले की पंजाबच्या राजकारणात ही एक ऐतिहासिक घटना आहे. यावेळी बहुजन समाज पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सतीश चंद्र मिश्रा उपस्थित होते.
निवडणुकीतील जागा वाटपाचा फॉर्म्युलाही दोन्ही पक्षांनी निश्चीत केला आहे, त्यानुसार बहुजन समाज पक्ष त्या राज्यात विधानसभेच्या 20 जागा लढवणार असून एकूण 117 जागांपैकी या 20 जागा वगळून उर्वरीत सर्व जागा अकालदल लढवणार आहे.
या आधी अकाली दलाची पंजाबात भारतीय जनता पक्षाशी युती होती. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अकालीदल एनडीए आघाडीतून बाहेर पडला आहे. त्या युतीत भाजपला 23 जागा मिळत असत. आता मात्र या राज्यात बहुजन समाज पक्षाशी अकालीदलाचे चांगले सूत जुळले आहे.