गोलंदाजासह सपोर्ट स्टाफमधील 12 जणांना बाधा; स्पर्धेवर अनिश्चिततेचे सावट
दुबई –आयपीएल स्पर्धेचे आयोजन करताना ज्या गोष्टीची भीती होती तीच घडली आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्ज संघातील एका वेगवान गोलंदाजासह सपोर्ट स्टाफमधील बारा व्यक्तींना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. या सर्वांच्या विलगीकरणाचा कालावधी एक आठवड्याने वाढविण्यात आला आहे. तसेच त्यांची पुन्हा करोना चाचणी होणार असून त्यात त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला तरच त्यांना स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. स्पर्धा आयोजक आयपीएल समितीने बीसीसीआयसह ही माहिती दिली आहे. यामुळे आता स्पर्धा होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आयपीएलसाठी अमिरातीत दाखल झालेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघातील एक गोलंदाज आणि सपोर्ट स्टाफमधील 12 जणांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. बाधितांची नावे जाहीर करण्यात आलेली नसली तरीही हा गोलंदाज भारतीय संघाकडूनही खेळला होता. चेन्नईच्या खेळाडूंनी नियमाप्रमाणे सहा दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केला होता. मात्र, आता सदस्यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना पुन्हा चाचणी द्यावी लागणार आहे.
येथे दाखल झाल्यावर सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफची करोचा चाचणी करण्यात आली होती. त्यात सपोर्ट स्टाफमधील 12 सदस्य आणि एका खेळाडूला करोनाची लागण झाल्यानंतर चेन्नईच्या संघाचा विलगीकरण कालावधी एक आठवड्याने वाढविण्यात आला आहे. चाचणीनंतर जर ते निगेटिव्ह ठरले तरच त्यांना स्पर्धेच्या बायो-बबलमध्ये प्रवेश मिळणार असून स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. ही स्पर्धा येत्या 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे.
स्पर्धेवर अनिश्चिततेचे सावट
स्पर्धेदरम्यान किंवा त्या काळात जर कोणा खेळाडूला किंवा सपोर्ट स्टाफमधील सदस्याला करोना झाला तर संपूर्ण स्पर्धाच धोक्यात येऊ शकते, असे काही दिवसांपूर्वी सांगितले जात होते. त्यामुळे आता आयपीएल समिती, संघ व्यवस्थापन व बीसीसीआय काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.