वर्षभरात 1 लाख 10 हजार जणांना लागण; 2646 जणांचा मृत्यू
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये 11 मार्च 2020 रोजी तीन करोना संशयित रुग्ण आढळले. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 12 मार्चला त्यांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. करोनाला शहरात प्रवेश करुन आज एक वर्ष पूर्ण होत आहे. कधीही ठप्प न होणारी उद्योगनगरी लॉकडाऊनमुळे ठप्प झाली होती. सुरुवातीच्या काळात खूप भीतीचे वातावरण होते. कुणीही बाहेर निघत नव्हते. अशा परिस्थिती अनेकांनी स्वतःची पर्वा न करता गरजूंची मदत केली. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांमध्ये सर्वाधिक करोनाबाधितांची नोंद झाली. नोव्हेंबरमध्ये रुग्णांची संख्या कमी होऊ लागली होती. मात्र आता फेब्रुवारीपासून पुन्हा बाधितांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्याने चिंता वाढली आहे.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये 11 मार्च रोजी परदेशातून काही नागरिक आले. त्यांना लक्षणे दिसत असल्याने महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी स्वॅब घेण्यात आला. 12 मार्च रोजी त्यांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. एकाच दिवशी शहरामध्ये तीन करोनाबाधित आढळल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. शहरात करोनाचा पहिला बळी 12 एप्रिल रोजी गेला. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये शहरातील बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात होती. मात्र जून महिन्यापासून बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली.
वर्षभरातील जुलै ते ऑक्टोबर हा काळ सर्वाधिक रुग्णवाढीचा काळ ठरला. या चार महिन्यांमध्ये शहरातील तब्बल 83 हजार 343 नारिकांना करोनाची लागण झाली. तर 1462 नागरिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर नोंव्हेबर महिन्यापासून करोना बाधितांचा आलेख खाली येण्यास सुरुवात झाली. या महिन्यामध्ये 4719 जणांना करोनाची लागण झाली. डिसेंबर महिन्यापासून फेबुवारी महिन्यापर्यंत सरासरी दर महिन्याला साडे तीन हजार बाधित शहरामध्ये आढळत होते. फेब्रुवारीच्या मध्यापासून पुन्हा बाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. दरदिवशी सरासरी 100 ते 150 रुग्णसंख्येच्या जागेवर आता पाचशे ते सहाशे रुग्ण आढळत आहेत.
सप्टेंबर महिन्यामध्ये मृतांच्या संख्येने सर्वोच्च बिंदू गाठला होता. या महिन्यामध्ये तब्बल 483 नागरिकांचा बळी गेला. शहरामध्ये करोनाचा पहिला बळी 12 एप्रिल 2020 रोजी गेला. या महिन्यात दोन बाधितांचा मृत्यू झाला. तर जून महिन्यामध्ये शहरातील करोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली. या महिन्यामध्ये रुग्णसंख्येने 3 हजारांचा टप्पा ओलांडत 77 नागरिकांचा बळी घेतला. या महिन्यामध्येच शहरात लागू केलेले निर्बंध शिथील करण्यास सुरूवात झाली. त्यामुळे नागरिक घराबाहेर पडले. त्याचाच परिणाम शहरातील रुग्णसंख्या वाढीवर झाला. जुलै महिन्यामध्ये 20 हजार 246 रुग्णांची नोंद झाली. सद्यस्थितीत शहरातील बाधितांची संख्या 1 लाख 10 हजार 70 इतकी झाली आहे. वर्षभरापुर्वी सुरू झालेली करोनाविरोधातील लढाई वर्षभरानंतरही कायमच आहे.
मार्चच्या नऊ दिवसांत 4418 रुग्ण
नोव्हेंबर महिन्यांपासून कमी झालेला करोनाचा आलेख फेब्रुवारीच्या मध्यापासून वाढू लागला आहे. त्यामध्ये मार्च महिन्यात आणखी वाढ झाली आहे. मार्च महिन्यामध्ये दर दिवशी सरासरी 490 ते 500 रुग्ण आढळत आहेत. मार्च महिन्याच्या नऊ दिवसांमध्ये तब्बल 4418 बाधितांची नोंद झाली. तर 27 जणांचा मृत्यू झाला आहे.