रायगड – राज्यातील करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक नेत्यांना करोनाची लागण झाली आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा करोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे त्यांनी करोना प्रतिबंधक लस घेतली होती. आता शेकापचे आमदार जयंत पाटील यांना करोनाची लागण झाली आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आणि आमदार जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच करोना प्रतिबंधक लस घेतली होती. तरी आज पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे करोनाच्या लसीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
करोनाची लागण झाल्याबाबत आमदार पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. माझी प्रकृती उत्तम आहे, मला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. त्याचप्रमाणे माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करावी आणि प्रत्येकाने आपली आणि आपल्या कुटूंबातील सदस्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले आहे.
यापूर्वी प्रसिद्ध गायक महेश काळे यांनाही कोरोनाची लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर धनंजय मुंडे यांनीही लस घेतली होती. मात्र ते दुसऱ्यांदा करोना पॉझिटीव्ह झाले आहेत.